सोलापूर । बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह उपसभापती, सचिव, संचालक मंडळ आणि कामगारांसह एकुण 125 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सोपल समितीचे सभापती असताना हा अपहार झाल्याचा आरोप आहे. प्रशासकांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. या कारवाईनंतर सोपल समर्थक संतप्त झाले असून बार्शीत तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ, रमेश कदम अपहारप्रकरणी तुरुंगाची हवा खात असताना आता आणखी एका आमदारावर अपहाराचा ठपका ठेवल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
बार्शी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल 15 ते मार्च 16 या कालावधीत व्यापारी अतिक्रमण, नियमबाह्य कामगार भरती, बाजार समिती निधी अपहार, शासकीय दस्तऐवजामध्ये बेकायदेशीर बदल करणे, या मुद्यांच्या आधारे लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या सोपल समर्थकांनी बाजारपेठ बंद करायला लावली. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत बाजारपेठ पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बार्शीत तणावपूर्ण शांतता आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहाराची प्रशासकांकडून चौकशी सुरू होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली, असे सोपल समर्थकांचे म्हणणे आहे.
1.5 कोटी रुपयांचा गैरव्यवहार
जिल्हा विशेष लेखा परीक्षक व्ही. व्ही. डोके यांनी हा गुन्हा दाखल केला. बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार, तर 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांनी सांगितले की, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निधीचा अपहार, जमिनीतील वसूल भाड्यामध्ये अपहार, बाजार समितीमध्ये जमिनीवर अतिक्रमण, नियमबाह्य हंगामी व रोजनदारी भरती, चुकीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत कर्मचारी यांना वेतन अदा करणे तसेच शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर बदल करणे असा एकूण 1.5 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी डोके यांनी दिलेल्या फियार्दीवरून बार्शी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावाले हे करत आहेत.