कोठडा, डाळीअंबा, सावरट, गायमुख, नवागावची यात्रा यंदा रद्द

नवापूर। येथील पोलीस स्टेशन हद्दीत ११ मार्च रोजी कोठडा, डाळीअंबा, सावरट येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा-उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नियमावली सूचना जाहीर केल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व धार्मिक, राजकिय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतीक, आंदोलने हे पुढील आदेश येईपर्यंत बंद केलेले आहेत. त्याअनुषंगाने कोठडा, डाळीअंबा, सावरट, गायमुख, नवागाव (सुकवेल) येथे महाशिवरात्रीनिमित्त भरण्यात येणारी यात्रा यंदा रद्द केलेली आहे.
संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोठडा, डाळीअंबा, सावरट, गायमुख, नवागाव (सुकवेल) येथे महाशिवरात्रीनिमित्त भरण्यात येणारी यात्रा यंदा रद्द केली आहे. याबाबत कोठडा गावाचे सरपंच सुरेखा कोकणी, उपसरपंच विरसिंग कोकणी, ग्रामसेवक अरविंद गावित, पोलीस पाटील विनोद देसाई, मंदिर ट्रस्टी तसेच डाळीअंबा गावाचे सरपंच ईलु गावित, उपसरपंच अंकुशराव गावित, पोलीस पाटील, ग्रामसेवक व मंदिर ट्रस्ट्री, सावरटचे सरपंच विलास वसावे, उपसरपंच जनद गावित, पोलीस पाटील सहादु वसावे नवागाव, सुकवेलचे सरपंच प्रकाश नाईक यांच्यासह पदाधिकार्‍यांनी यात्रोत्सव रद्द केलेला असल्याने भाविकांनी यात्रोत्सवाकरीता येऊन गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे.