कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न ; बावरीची भरली जिल्हापेठ पोलिसांमध्ये धडकी?

0

दाखल गुन्ह्याचाही कुणीही तपास घेईना

जळगाव – जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत अट्टल घरफोड्या मोनुसिंग बावरी याने डोक्याला बांधलेल्या फेट्यातील पीनच्या सहाय्याने छातीवर तसेच हातावर वार करुन स्वतःला जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. घटनेने पोलीस कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. भितीपोटी बावरी विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास घेण्यास जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी नकार देत असल्याने शनिवारी ठाणे अंमलदाराची चांगलीच गोची झाली होती.

बावरीला सुनावली होती 25 पर्यंत पोलीस कोठडी
रामानंदनगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हयात संशयित मोनुसिंग बावरी यास रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. यानंतर सायंकाळी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने बावरी यास 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात कोठडी नसल्याने मोनुसिंग यास जिल्हापेठच्या पोलीस कोठडी सोडून रामानंदनगर पोलीस निघून गेले.

बावरीविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोनुसिंग बावरी याने आरडाओरड करत जिल्हापेठच्या कोठडीत गोंधळ घातला. तसच त्याच्या फेट्याला लावलेली पिन काढून त्या पिनने बावरी याने स्वतःच्या हातावर, छातीवर वार करुन जखमी करुन घेतले होते. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ बावरी यास ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉस्टेबल किरण श्रीधर पाटील याच्या फिर्यादीवरुन मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार भादिव कलम 309, 514 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता पोलीस निरिक्षकच तपास करतील…
बावरी विरोधात दाखल आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्याचा तपास एका कर्मचार्‍याकडे देण्यात आला. मात्र तो रजेवर असल्याचे कळाल्याने कर्मचार्‍यांना तपास घेण्यास ठाणे अंमलदाराकडून सुचना करण्यात आल्या. मात्र दोन ते तीन कर्मचार्‍यांनी बावरीच्या गुन्ह्याचा तपास घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे ठाणे अंमलदाराची गोची झाली होती. तपास कुणाकडे देणार, असे विचारले असता, आता तुम्ही थेट पोलीस निरिक्षकांचेच नाव टाका, असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

बावरी विरोधात का आहे कर्मचार्‍यांमध्ये भिती
पोलीस कोठडीत बावरीने आत्महत्येचा प्रयत्न केला, उपद्रवी मोनुसिंग पुन्हा काही करु शकतो, तसेच त्याने काल बावरीने जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून पोलिसांकडून त्रास होत असल्याने न्यायालयाने सांगणार असल्याचे सांगितले होते. यामुळे तपास घेण्यास पोलीस कर्मचार्‍यांमध्ये भिती असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तपास घेवून अनेक कागदपत्रे गोळा करुन तपास पूर्ण करण्याचा कंटाळा असल्यानेही कर्मचार्‍यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.