कोठडीत मृत्यू टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणार

0

मुंबई । राज्यात यापुढे आरोपींचा कोठडीत मृत्यू होवू नये, यासाठी गृह खात्याची तातडीने बैठक बोलावण्यात आली असून, त्यानुसार यावर चर्चा करून सुधारणा करण्यात येणार असून याबाबत ठोस निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिली. सांगलीमधील अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री केसरकर भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या प्रकरणात प्रसिध्द कायदेतज्ञ उज्वल निकम यांच्याकडे या केसची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
केसरकर यावेळी म्हणाले की, सांगलीत जावून स्थानिकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधित अडचणी समजून घेतल्या आहेत. कोथळे प्रकरणी ज्या अधिकार्‍यांकडून कामचुकारपणा झाला त्यांना निलंबित केले आहे. राज्यात कोठडीत मृत्यू होणे हे योग्य नाही असेही केसरकर यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित कोथळे कुटूंबिय व साक्षीदार भांडारे कुटूंबियांना संरक्षण देण्याच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्या आहेत. या केसचे वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येईल. दोन व्यापार्‍यांची चौकशी सीआयडी करत आहेत. सीआयडीने तपासास सुरूवात केली आहे. लोकांच्या कडून कायदा आणि सुव्यवस्था अडचणी समजून घेतल्या. ज्यांच्याकडून कामचुकारपणा झाला त्यांना निलंबित केले आहे.

कैद्यांबाबत मार्गदर्शक सूचना तयार करणार
केसरकर पुढे म्हणाले, कोठडीमध्ये आरोपांची चौकशी करताना ती कशा पध्दतीने व्हावी याचे मार्गदर्शक सुचना नव्याने बनवण्यात येत आहे. कुणाचाही यापुढे कोठडीत मृत्यू होऊ नये यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे आणि त्यानुसार चर्चा करून कशी अंमलबजावणी करता येतील यावर चर्चा होईल. त्याचबरोबर मंजुळा शेट्ये प्रकरण जेलमधले होते. जेलमध्ये कैद्यांना कशी वागणूक दिली याचे मार्गदर्शक सुचना तयार करण्यात येत आहेत. सांगलीतील कोथळे प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. या प्रकरणाचा सर्व तपास हा 24 तासाच्या आत लागला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी निःपक्षपाती केली जाईल असेही ते म्हणाले.