कोणत्याही स्थितीत केळीला फळाचा दर्जा मिळवून देणारच : ना. गुलाबराव पाटील
फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत बैठक : याबाबतचा पाठपुरावा सुरू
मुंबई : केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना अनेक अडचणी येत असून यावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे यांच्यासोबत सोमवारी बैठक घेतली. यात सकारात्मक चर्चा होऊन मार्ग निघला असून येत्या काळात केळीला फळाचा दर्जा प्राप्त होणार असून यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासात नवीन अध्याय सुरू होणार असल्याचेही ना. पाटील यांनी नमूद केले आहे.
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर असला तरी अलीकडच्या काळात उत्पादकांना अनेक अडचणी येत आहेत. यातील प्रमुख मुद्दा हा केळीला फळाचा दर्जा नसल्याचा आहे. यामुळे शेतकर्यांना फळपीक विमा मिळत नसून पीक विम्यातील जाचक अटींमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासोबत फळाचा दर्जा नसल्यामुळे केळीच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या वॅगन्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. तसेच फलोत्पादन खात्याच्या विविध शासकीय योजनांचा लाभ देखील मिळत नाही. यामुळे केळीला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत आहे.
हे देखील वाचा
या प्रकरणी मार्ग निघून केळीला फळाचा दर्जा मिळावा यासाठी आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकार्यांसह राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे यांच्यासह आज बैठक घेतली. यात केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही ना. संदीपान भुमरे यांनी दिली. यासाठी पाठपुरावा करून केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रोहयो आणि फलोत्पादन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आजपासून पाठपुरावा सुरू झाला असून हा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या माध्यमातून केळीचे आगार समजल्या जाणार्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन देखील ना. पाटील यांनी केले आहे.