धुळे । भाजपाचे आ. अनिल गोटे यांच्यावर पत्रकातून हल्ला चढविणार्या विविध राजकीय पक्षांच्या महिलांना लोकसंग्रामच्या महिला संघटनेच्या रणरागिनींनीही पत्रकातूनच इशारा दिला आहे. आ. गोटे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांची अंत्ययात्रा काढून आपण स्त्री जातीला काळीमा फासला आहे. वरुन त्यांनाच धमक्या देत आहात. जर कोणीही आगाऊपणा केल्यास त्यांची गय करणार नाहीत, असे लोकसंग्रामच्या रणरागिनींनी म्हटले आहे.
विरोधकांना भरला सज्जड दम
भाजपाचे आ. अनिल गोटे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्यानंतर सोशल मिडीयावर झालेल्या पत्रक युध्दात आ. गोटे यांनी विविध राजकीय पक्षाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. त्यानंतर आंदोलक महिलांनीही पत्रकातून आ. गोटे यांच्यावर तोफ डागली होती. महिलांचा अपमान केल्याप्रकरणी आपणास येत्या 28 तारखेला भेटून उत्तर देण्याचा इशारा संतप्त आंदोलक महिलांनी दिला होता. आंदोलक महिलांनी दिलेल्या इशार्यामुळे लोकसंग्राममधील महिलाही आक्रमक झाल्यात. त्यांनी व लोकसंग्राम पक्षातील कार्यकर्त्यांनी शनिवारी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून आंदोलक महिलांसह मंदिर बचाव कृती समितीमधील कार्यकर्त्यांना तसेच आ. गोटेंच्या विरोधकांना धमकी वजा इशारा दिला आहे. यामुळे आता मंदिर बचाव कृती समितीच्या आंदोलक दुर्गांविरुध्द लोकसंग्रामच्या रणरागिणी असा संघर्ष सुरु झाला आहे.आम्ही आदिवासी, दलित, मुस्लिम, कुंभार अशा जातीतुन आलो असल्याने आम्हालाही गल्ली मैदान करण्याची सवय आहे. एका बुक्कीत तुम्हाला नाही बाप आठवला, नाही जन्माची अद्दल घडवली तर नाव सांगणार नाही, असे म्हणत अण्णासाहेबांकडे वाकडी नजर करून पहा मग तुम्हाला कळेल, खरी रणरागिणी कोण? याल तुमच्या पायाने, जाल कसे? असे म्हणत लोकसंग्राम महिला आघाडीने सज्जड दम भरला आहे. पत्रकावर अध्यक्षा लताताई वडर, सातपुते, गायत्रीबाई, हसीनाबी, आयशा पठाण, एस.आर. कोठावदे, अलका भोई, आर.एस. पोतदार आदींची नावे आहेत.