पुणे : आंबेडकरी चळवळींमध्ये काम करणार्या व्यक्तीला पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा सन 2016 चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. चित्रपट म्हणजे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून जातीची कवाडे बंद केली पाहिजेत, असे मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. आज पुणे महापलिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते दिग्दर्शक मंजुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी पालिकेतील पदाधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
नागराज मंजुळेंचे मनोगत
समाजाला ङ्गसैराटफ समजलाच नाही. मी जात लपवून ठेवली नाही, त्याचबरोबर स्वतःची खोटी माहिती सांगितली नाही. मात्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाज सुधारणेची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजही जातीची कवाडं करकचून बांधून ठेवली आहेत.
जग इतकं मोठं आहे, तर मी दलित असण्याची खंत का बाळगावी. कोणीही जातीने माजू नये आणि लाजूही नये. मी जे चित्रपट करतो ते माझे अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. जातीची कवाडे बंद केली पाहिजेत. चुकीच्या स्पर्धेत धावणे थांबवलं पाहिजे. तर द्वेषाला प्रेमाने उत्तर दिले पाहिजे सांगत जातीच्या पलीकडे माणसाने जाणे गरजेचे आहे.