नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ऑक्टोबर 2017 मध्ये होत असून अजून काहीसा कालावधी शिल्लक असला तरी रथीमहारथी इच्छूकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) करता आगामी महापौरपद राखीव असून सर्वच पक्षात मातब्बर ओबीसी उपलब्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे काठावरचे बहूमत असल्याने शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस अशी महाआघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याचे मनोरथ अनेक राजकीय घटक रचत असले तरी महापौरपदाचा उमेदवार निश्चित होताच महाआघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
जे महापौरपदाचे चित्र राष्ट्रवादीत आहे, तेच विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेतही आहे. विजय चौगुले, एम. के. मढवी, नामदेव भगत अशी खास नावे महापौरपदाच्या उमेदवारीकरता उपलब्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणे अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचाच शब्द अंतिम प्रमाण मानला जात आहे. तर स्थायी समिती सदस्य निवडीवरून शिवसेनेतील वादाचा कलगीतुरा सर्वांनाच जवळून पहावयास मिळाला आहे. 38 सदस्यांचे संख्याबळ असणार्या शिवसेनेत चौगुले गट आणि नाहटा गट यांचा मनोमिलन होणे अवघड असल्याचे दिसून येते. अनेक नगरसेवक चौगुले गट व नाहटा गटात सामील न होता आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत.
सेनेत होऊ शकते फाटाफूट?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकनेते गणेश नाईकांचाच शब्द अंतिम प्रमाण असल्याने महापौर निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दगाफटका होण्याची शक्यता नाही. शिवसेनेत स्थायी समिती सदस्य निवडीतील नाराजीचा आकडा 20 वर गेला असून महापौर निवडणूकीत कोणा प्रस्थापितांनीच पुन्हा उमेदवारीवर दावा केल्यास पुन्हा एकवार शिवसेनेच्या छावणीत अष्टविनायक प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यावेळी मात्र हा आकडा अष्टविनायकावरच सिमीत राहता 18 ते 22 च्या घरात जाण्याची भीती खुद्द शिवसैनिकांकडूनच व्यक्त करण्यात येत आहे.
स्थायी समितीवर जावूनही यांचे समाधान होणार नाही, महापौर निवडणूकीलाही उमेदवारी मागणार, महापौर निवडणूकीत पडल्यावर पुन्हा विधानसभेची उमेदवारी मागणार, शिवसेना संघटना काय यांच्या नावावर करून दिली काय, अशा संतप्त प्रतिक्रिया आताच शिवसेनेच्या नगरसेवकांकडून खासगीमध्ये व्यक्त करण्यात येवू लागल्या आहेत. त्यामुळे पालिका सभागृहातील शिवसेनेत ज्वालामुखी खदखदत असून कोणतेही क्षणिक कारण फुटीला कारणीभूत ठरू शकते.
उपमहापौरपद वाशीगावकडे?
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेले काही मातब्बर बाहूबलींना गणेश नाईकांचा आजही लळा असल्याने नाईकांनी निर्णायक क्षणी भावनिक साद घातल्यास त्यांना नाईकांच्या प्रेमाचा पान्हा पुन्हा फूटू शकतो अशी भीतीही शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आघाडीचा धर्म निभावताना उपमहापौरपद पदरी पडत असल्याने काँग्रेसकडून दगाफटका होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. उपमहापौरपदाकरिता काँग्रेसच्या छावणीत गोठीवली व वाशी गाव व ऐरोलीही उत्सूक असल्याचे आता लपून राहीलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे काठावरचे बहूमत आहे. वाशी गावाला उपमहापौर दिल्यास घरातील तीन नगरसेवक आणि त्या जोडीला वाशी व ऐरोलीतील एक नगरसेवक जमाबेरीज करता पाच नगरसेवकांची तरतूद राष्ट्रवादी काँग्रेसला करून देण्याइतपत वाशी गावातील काँग्रेसी नाना सक्षम आहेत.
सुधाकर सोनवणे भाजपाचे उमेदवार?
शिवसेना-भाजपातील वाढत चाललेले विळ्या-भोपळ्याचे सख्य पाहता भाजपा नगरसेवक तटस्थ राहण्याचीही शक्यता आहे. महापौर निवडणूकीला अद्यापि तीन महिन्याचा कालावधी असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच महापौरपदाचा कालावधी संपताच सुधाकर सोनवणेंच्या भूमिकेकडे व हालचालींकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. भाजपा व रिपाइंची सध्याची सलगी पाहता ऐरोली मतदारसंघातून सुधाकर सोनवणे भाजपाचे उमेदवार असण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.