महाड । दुर्गम भागात राहणार्या आदिवासी समाजाला पाणीटंचाईची झळ अधिक बसत असते. पाणीटंचाईबाबत हा समाजही आता जागरुक होऊ लागला आहे. याचा प्रत्यय महाड तालुक्यातील कोतुर्डे सोंडेवाडी येथे आला आहे. जिल्हा परिषदेच्या वनराई बंधार्याला या आदिवासींनी प्रतिसाद देत श्रमदान करत वाडीवर वनराई बंधारा बांधला. आता टँकरग्रस्त असलेल्या या वाडीला मे अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. वनराई बंधार्यांची कामे तीन वर्षांपासून बंद झाल्याची बातमी प्रसिध्द केल्यानंतर नवे मुख्याधिकारी यांनी तातडीने नदीत पाणीसाठा असता असतानाच वनराई बंधार्यांची कामे हाती घेतली आहेत. येथे पंचायत समितीच्या कृषी विभागाने ग्रामपंचायत व आदिवासी बांधवांच्या मदतीने 120 फूट लांबीचा वनराई बंधारा बांधला आहे. सुमारे तीस आदिवासींनी येथे श्रमदान केले. कृषी अधिकारी डी. के. पाटिल व एस. एम. सरकटे, विस्तार अधिकारी ए. व्ही. जामकर व श्री. फरतडे, कोतुर्डे सरपंच अंकुश पवार, ग्रामसेवक संजय जाधव उपस्थित होते.