पुणे : येथील शहरात घरफोड्यांनी सद्या धुमाकूळ घातला असून, तसा सुरक्षित समजला जाणारा कोथरूड परिसरात देखील त्यातून सुटलेला नाही. दोनच दिवसांपूर्वी कोथरूड मधील महादेव मंदिराची दानपेटी फोडून रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांना रंगेहाथ पकडले असतानाच, पुन्हा एकदा कोथरूड मधील नामांकित सोसायटीमध्ये चोरट्यांनी एका सदनिकेवर हात साफ करत, तब्बल ४ लाख रुपयांच्या ऐवाजावर डल्ला मारला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशिगंधा जोशी (वय.२५ रा.कोथरूड, पुणे) यांनी याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. निशिगंधा जोशी या त्यांच्या कोथरूड मधील नामांकित सोसायटी असलेल्या मंत्री पार्क मधील शशिकांत टेरेस या इमारतीमधील घराला बुधवार (दि.९) रोजी रात्री ९ वाजता कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. तर गुरुवार (दि.१०) रोजी रात्री ९ वाजता त्या परतल्या. यावेळी त्यांना त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटले असल्याचे दिसले.
यावेळी त्यांनी चोरीचा संशय आल्याने बेडरूम मध्ये धाव घेऊन, मौल्यवान सोने चांदीचे दागिने आणि रोकड ठेवलेल्या त्यांच्या लाकडी कपाटाची पाहणी केली असता, त्यातून सर्व सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा अंदाजे ४ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांना दिसले. याबाबत त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे तपास करत आहेत.