पुणे : शिवसृष्टी प्रकल्प होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मेट्रोच्या डेपोसाठी डीपीआरमध्ये असलेले स्थान याचा विचार करता महामेट्रोचे अधिकारी, पालकमंत्री, इतर पक्षांचे नेते, गटनेते यांना बोलवून चर्चा करू या व त्यातून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसृष्टीवर आयोजित महासभेत जाहीर केले. सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी त्यांना दुजोरा देत या प्रकल्पासाठी निधीची काहीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेत कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याच्या विषयावर खास सभेचे आयोजन केले होते. संबंधित 9 एकर जागेवर स्टेशन उभे करायचे की शिवसृष्टी यावरून 2009 सालापासून वाद सुरू आहे. त्यावरून अनेकदा स्थानिक नगरसेवक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. याच विषयावर जवळपास साडेचार तास चाललेल्या या सभेननंतर बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निश्चित झाले. यावेळी पन्नासपेक्षा अधिक सभासदांनी आपली मते व्यक्त केली.
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी मेट्रोच्या अधिकार्यांना बोलावले असते तर सत्य परिस्थिती समोर आली असती असे मत मांडले. छत्रपतींचा पुतळा महापालिकेत आणत असताना सुरक्षारक्षकांनी अडविणे शरमेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी 3 जुलैला महामेट्रोचे दिक्षीत यांनी मेट्रो आणि शिवसृष्टी दोन्ही होऊ शकते असे सांगितले असताना पुन्हा त्यांना विचारण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला. या ठिकाणी मेट्रोचा डेपो दाखविलेला नसून पब्लिक-सेमी पब्लिक झोन दाखविलेला नाही. हे नकाशे राज्य सरकारने मंजूर केले आहेत. त्यामुळे या जागेवर मालकी महापालिकेची असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेचा आहे असे ते म्हणाले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी शिवसृष्टी आणि मेट्रो व्हायला पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र शिवाजीमहाराजांचे स्मारक कचराडेपोवर कशासाठी असा प्रश्न विचारला. त्यावर विरोधी पक्ष नेते तुपे यांनी विषयपत्रात सर्व्हे नं. 92, 93 असे म्हटले आहे. कचराडेपो असे म्हटलेले नाही, याची आठवण करून दिली.
मेट्रोचा दगडही उभा करू देणार नाही……
छत्रपती शिवाजीमहाराजांनी राज्यकारण केले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणार्या शिवसृष्टीमध्ये राजकारण करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसृष्टीसाठी सातत्याने आग्रही भूमिका मांडणारे दीपक मानकर यांनी व्यक्त केले. हा प्रकल्प राखड्याला केवळ प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्त कुणाल कुमार अनुपस्थित असण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एखाद्या टेंडरचा विषय असता तर ते नक्की उपस्थित राहिले असते असेही ते म्हणाले. जर शिवसृष्टी उभारायची नसेल तर मी माझी हवेली तालुक्यातील 100 एकर जागा या प्रकल्पासाठी देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मानकर भावुक झाल्याचे बघायला मिळाले. मात्र कोथरूडला शिवसृष्टीचे भूमिपूजन होत नाही तोवर मेट्रोचा दगडही उभा करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.