आधी सोडले होते संतापात घर नंतर लागला होता गोरखपूरात शोध
भुसावळ (गणेश वाघ)- मुक्ताई मंदिरासमोर भाविकांसाठी तयार केलेल्या घाटात पडलेल्या बालकाला जीवदान दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालशौर्यपुरस्कार पटकावणार्या निलेश रेवाराम भिल्लमुळे जगाच्या काना-कोपर्यात कोथळीचे नाव पोहोचले होते मात्र वडील रागावल्यानंतर संतापाच्या भरात निलेश (12) ने लहान भाऊ गणपत (7) ला सोबत घेत 17 मे 2017 रोजी कोथळी सोडले होते. दोघे भावंडे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता तर दोघे भावंडे रेल्वेने निघून गेल्यानंतर सुरुवातीला कानपुरात गणपतचा शोध लागला होता तर त्यानंतर निलेश मात्र बेपत्ताच होता मात्र काही महिन्यानंतर निलेशही गोरखपूरातील स्नेहालयात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी त्याचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताबा घेत 6 फेब्रुवारी 2018 रोजी त्यास मुक्ताईनगरात आणले होते. नऊ महिन्यांपासून ताटातुट झालेल्या मुलाला पाहिल्यानंतर आईच्या अश्रूंचा बांध सुटला होता. यानंतर निलेशला शिक्षणासाठी मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथील खडकोद येथील श्रीराम गुरूकुल आश्रमात दाखल करण्यात आले होते.
भल्या पहाटेच सोडला आश्रम
4 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास निलेशने आश्रम सोडला असून त्याबाबत सीसीटीव्हीत दृश्य कैद झाले आहे. याबाबतची माहिती निलेशच्या कुटुंबियांना कळवल्यानंतर निलेशची आई आश्रमात दाखल झाली. मुख्याध्यापकांशी चर्चा केल्यानंतर मध्यप्रदेशातील शिकारपूरा पोलिस ठाण्यात निलेश बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती या आश्रमाचे ट्रस्टी सुंदरलाल चौधरी यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली.