भाजपचे धडाकेबाज नेते एकनाथराव खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी गावच्या निलेश भिलवर गेल्यावर्षी ’दिव्य मराठी’ रसिकसाठी कव्हर स्टोरी केली होती. ‘मुलगा शोधला, त्याला शौर्यपदक दिले, आमचे कर्तव्य संपले’, ही परिचित भाषाच कानी पडत राहणार, अस एक वाक्य त्यात होतं. हेच वाक्य खरं ठरलंय. निलेश आणि त्याचा लहान भाऊ तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप कुठलीही खबर लागलेली नाहीये. त्याला त्यावेळी म्हणजे जवळपास वर्षभरापूर्वी दिलेलं घराचं आश्वासन कुठे विरून गेलेय हे समजायला मार्ग नाही. त्याने पुरस्कार जिंकला त्यावेळी जिल्ह्यातील किंवा माझ्या मतदारसंघातील पोरगा म्हणून मिरवून घेणार्या बड्या नेत्यांचे त्याच्या परिवाराला एक घर बांधून देणे हे नैतिक कर्तव्य आहे. आदिवासी, मागासलेला म्हणून सतत हिणवला जाणारा हा वर्ग राजकीय प्रवाहात केवळ शोभेचे बाहुले असतो. जर मतदारयादीत नाव असेल तरच त्यांना महत्त्व अन्यथा त्यांचे जगणे त्यांनाच लखलाभ. इथे मात्र आदिवासी म्हणून नव्हे, तर एका लहान मुलाचे शौर्य म्हणून तरी त्याला मदत व्हायला हवी होती. मात्र, तो मिळायला खडतर वाटेचा स्पीडब्रेकर आडवा येतोय की काय? असेच वाटायला लागलेय.
घरात… घरात नव्हे झोपडीत अठरा विश्वे दारिद्र्य. दोन वेळेच्या जेवणाचा मोठा सवाल समोर ठेवून जगणारा रेवाराम भील परिवार अतिशय हलाखीच्या स्थितीत जीवन जगत असताना त्यांचा 9 वर्षांचा मुलगा निलेशने दाखवलेल्या शौर्य व धाडसाची दखल घेत त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. नाथाभाऊ यांच्या कोथळीत 30 ऑगस्ट 2015 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी ओंकार उगले रा. बुलडाणा हे कुटुंबीयांसह कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले होते. तेथे पूर्णा नदीचे बॅक वॉटर मंदिराच्या समोरच्या बाजूस सोडून घाट तयार करण्यात आला आहे. भागवत उगले, (वय-11) हा बालक घाटावर हातपाय धुण्यासाठी गेला होता. मात्र, तो पाय घसरून पाण्यात पडला. तो मुलगा गटांगळ्या खाताना दिसताच त्याच्या आईने आरडाओरड सुरू केली. पाणी खोल असल्याने मुलगा बुडत होता. ही घटना लक्षात येताच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अवघ्या 9 वर्षांच्या निलेशने क्षणाचाही विलंब न करता, कशाचीही पर्वा न करता खोल पाण्यात सूर मारला आणि त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या भागवतला हाताला खेचत सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. बघता-बघता निलेशच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक झाले. निलेश हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याच्याकडे पोहण्याचे कौशल्य आहे. आपल्या या कौशल्याचा वापर करत त्याने धाडसाने आपल्या जीवाचा विचार न करता निष्पाप बालकाचा जीव वाचवला आणि त्याची राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली. एकनाथराव खडसे अर्थात नाथाभाऊ, यांचं मुक्ताईनगर तालुक्यातलं कोथळी हे जन्मगाव. नाथाभाऊ यांच्यामुळेच हे गाव चर्चेत आणि आकर्षणाचं केंद्रही. त्यांच्यानंतर हे गाव आणखी एका कारणाने चर्चेत आलं आहे. ते कारण ठरला आहे, निलेश भिल. 11 वर्षांचा एक आदिवासी मुलगा. त्याचं कर्तृत्व निश्चितच गावाचा अभिमान वाढवणारं. निलेशचे शाळासोबती, मित्र, शिक्षक सार्यांसाठीच अभिमानाची गोष्ट झाली. जिथे गावाची आकर्षक कमान आणि रस्ता सुरू होतो, तिथूनच एक कच्चा रस्ता फोडलेल्या डोंगराच्या कुशीतून निलेशच्या घराकडे जातो. प्रचंड धूळ उडवत खडी क्रशरच्या प्रचंड आवाजाचा सामना करत असलेली एक उजाड वस्ती. सगळीकडे धूळच धूळ. या वस्तीवरचे जवळपास सगळे कुटुंबप्रमुख त्या क्रशरवर दगड फोडण्याचं आणि ते उचलण्याचं कामं करतात. तिथच एका कुडाची तुटकी झोपडी निलेशची. त्याच झोपडीत शौर्याचा पुरस्कार आलाय. अर्थात झोपडीत तो नावालाच. तो ठेवला गेला जिल्हा परिषदेच्या शाळेत.
अत्यंत मानाचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार फोटो फ्रेम आणि पदकाच्या रूपाने आला आणि झोपडीचे फोटो काढायला तुफान गर्दी झाली. पेपरमध्ये बातम्या झळकू लागल्या. जागोजागी निलेशचे सत्कार होऊ लागले. एकच ड्रेस धुऊन सगळ्या सत्काराला वापरत तोही काही दिवस फिरला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात निलेशचा सत्कार होता. त्यावेळी त्याचे आईवडील आणि मुख्याध्यापक सोबत आले होते. हा सत्कार अभूतपूर्व होता. या सत्काराच्या वेळी हजारो विद्यार्थ्यांनी जागेवर उठून उभा राहत टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर निलेशप्रति अभिमान दिसून येत होता, त्याच्यासोबत फोटो काढायला गर्दी होत होती. यानंतर निलेशला आणि त्याचा परिवाराला विविध लोकांकडून आणि सामाजिक संस्थांकडून मदतदेखील मिळाली. अनेक संस्थांनी त्याला व त्याच्या संपूर्ण परिवाराला दत्तक घेण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र, घोडे कुठे अडले तेच कळले नाही. त्याला घर देण्याचे आश्वासन खा. रक्षाताई खडसे यांनी दिले. ते अजूनही आश्वासनच आहे. याचा मी बर्याच दिवस माझ्या लेव्हलवर काही पाठपुरावादेखील केला. अर्थात त्यात मोठेपणा किंवा विशेष असं काहीच नाही. फोन करून कुठवर आलंय काम? हे विचारणं म्हणजे खरंतर पाठपुरावा नव्हेच. त्याचं घर माफ करा, झोपडी आजही तशीच आहे. पुरस्काराने त्याच्या किंवा त्याच्या परिवाराच्या आयुष्यात कुठलाही फरक पडलेला नाही. असो, आता निलेश आणि त्याचा भाऊ सहा-सात दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांना फोनवर विचारलं तर ते म्हणताहेत, आम्हाला प्रोसेजरनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागलाय. याआधीही तो एक-दोन वेळा असाच घरातून निघून गेल्याची माहितीही त्यांनी दिलीय. दोन मुलं एकाच वेळी गायब होणे हे संदेहास्पद आहे. राष्ट्रपती शौर्य पुरस्कार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला काय होणार? असं विचारलं तेव्हा निलेशने डॉक्टर होणार असं सांगितलं होतं. यानंतर निलेशचे ठिकठिकाणी सत्कार झाले. पण केवळ सत्कार आणि हारतुर्याने त्यांच्या आयुष्यात काही फरक पडला का? हा मोठा सवाल होता आणि आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे एवढे मोठे आणि महत्त्वाचे नेते असलेले नाथाभाऊ यांचे हे गाव तरीही निलेशची एवढी उपेक्षा का? त्याच्या घरापासून शाळा दोनेक किलोमीटर दूर असल्याने तो शाळेत येत नसायचा मात्र, पुरस्कार मिळाल्यापासून तो शाळेत जायला लागला होता. निलेशने हे शौर्य केल्यापासून त्याच्या परिवाराला समाजात वरवरचा मान मिळत गेला. मात्र, याच्याने त्याच्या परिवाराच्या काम करण्यात किंवा जगण्यात विशेष असा काहीच फरक नाही पडला. पुरस्कार मिळाल्याने नाथाभाऊ यांच्यानंतर मुक्ताईनगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारा निलेश दुसरा व्यक्ती. नाथाभाऊ आणि निलेशचं कौतुक करणारे अनेक राजकारणी तसेच समाजकारणीसुद्धा एसीच्या घरात राहतात. असो, नाथाभाऊ सध्या अनेक कारणांनी राजकारणात बॅकफूटवर आले आहेत. संकटांनी त्यांना घेरलंय, असं चित्र आहे. दुसरीकडे निलेश आणि त्याचा परिवार अजूनही अखंड धूळ खात, 46-47 डिग्रीचा सामना करत उघड्या असणार्या झोपडीतच जिंदगी जगण्याचा संघर्ष करतोय. आपल्याकडे शौर्य मिळाल्याच्या नंतर व्यवस्थेकडून काही काळ उत्सव साजरा केला जातो. मात्र, दीर्घ आणि निरंतर व्यवस्थित ट्रीटमेंट मात्र होत नाही. इथही तेच झालंय. कोथळीचे शौर्य हरवलेय. ते लवकर मिळावे हीच अपेक्षा…!