भुसावळ (गणेश वाघ)। राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारप्राप्त नीलेश भिल्ल हा देखील कानपूरातच असून त्याबाबत त्याचा लहान भाऊ गणपतने दुजोरा दिल्याने कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोन्हीही भावंडे तब्बल दोन महिन्यांपासून कानपूरात कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे आली असून नीलेशचा शोध घेण्याचे मात्र आता आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने सुभाष चिल्ड्रन होममधून गणपतचा गुरुवारी सायंकाळी ताबा घेतला तर शहरातील अन्य पोलीस ठाण्यांमध्ये नीलेशबाबत विचारपूस सुरू करण्यात आली आहे.
जिंकूनही हरले ‘शौर्य’
सुमारे दोन वर्षांपूर्वी कोथळी मंदिर तिरावरील बुडणार्या बालकास वाचवल्याने नीलेश भिल्ल (12) प्रकाशझोतात आला होता. त्याच्या धाडसाची दखल घेत त्याला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले होते. झोपडीतील अठरा विश्व दारिद्य्राशी संघर्ष करणार्या भिल्ल कुटुंबियांना लोकप्रतिनिधींनी घर बांधून देण्यासह अनेक आश्वासने दिली मात्र ती आश्वासनेही काळाच्या ओघात हवेत विरली. अशाही परिस्थितीत संघर्षाशी दोन हात सुरू असताना शाळेत न गेल्याने संतापलेल्या वडिलांनी नीलेशला रागावल्यानंतर 17 ते 18 मे च्या दरम्यान झोपडीतून नीलेश (12) हा झोपडीतून बाहेर पडला. एव्हाना झोपडीत लहान भाऊ असल्याने तोदेखील मागे लागला. भावाच्या हट्टामुळे नीलेशनेही गणपत (7) ला सोबत घेत पायीच कोथळी सोडले. मिळेल त्या दिशेने भटकत-भटकत ही भावंडे उत्तरप्रदेशातील कानपूरच्या सेंट्रल रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचली. ती नेमकी येथपर्यंत कधी, कशी व का आली? या दरम्यानच्या काळात नेमके काय घडले ? हे गणपत मुक्ताईनगरात आल्यानंतर पोलिसांच्या तपासात कळणार आहे.
कचरा विकून भागवली भूक
रेल्वेद्वारे कानपूरात दाखल झालेली दोन्ही भावंडे तब्बल दोन महिने सोबतच राहिली. दिवसभर शहरातील कचरा वेचून त्यातून आलेल्या पैशातील दोघांनी पोटाची भूक भागवत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्मचा रात्री आसरा घेतला. कुटुंबाची ओढ लागली असलीतरी कोथळी एव्हढेच नाव डोळ्यापुढे असल्याने परतीचा प्रवास कसा करावा? कदाचित हेदेखील त्यांना माहित नसावे म्हणूनच कदाचित या भावंडांनी या शहरात मुक्काम केला असावा !
आठ दिवसांचे परीश्रम फळाला
चिल्ड्रन होममध्ये गणपत दाखल झाल्यानंतर समुपदेशकांनी त्याच्याशी संवाद साधून त्यास बोलण्याचा प्रयत्न केला मात्र भाषेची अडचण व त्यात अवघे सात वर्षांचे वय यामुळे तो केवळ कोथळी इतकेच नाव सांगत असल्याने पदाधिकार्यांनी इंटरनेटद्वारे देशभरातील कोथळी नामक गावांचा शोध घेतला. अखेर आठव्या दिवशी परिश्रम फळाला आल्यानंतर मंगळवारी मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर गणपतची ओळख पटली व तब्बल 91 दिवसांपासून बेपत्ता भावंडाच्या सुरू असलेल्या तपासात मोठाच दिलासा मिळाला. सुभाष चिल्ड्रन होमचे संचालक कमलकांत तिवारी, समन्वयक विनयकुमार ओझा, ऋचा तिवारी आदींनी याकामी मोठे परीश्रम घेतले.
लोहमार्ग पोलिसांनी घेतला नीलेशचा ताबा?
कचरा वेचणार्या काही मुलांना 24 जुलै 2017 रोजी कानपूर सेंट्रल रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले त्यात नीलेशचा समावेश असल्याची माहिती गणपतने चाईल्ड लाईनच्या पदाधिकार्यांना दिली आहे. गणपतलाही पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र तो अवघा सात वर्षांचा असल्याने त्याचा चाईल्ड लाईनकडे ताबा देण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी नीलेशची नंतर मात्र कुठे रवानगी केली वा तो कुठे गायब झाला? याबाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सुभाष चिल्ड्रन होमच्या पदाधिकार्यांनी रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलीस ठाण्यासह शहरातील अनेक पोलीस ठाण्यात नीलेशबाबत चौकशी केली मात्र त्याचा कुठेही पत्ता लागलेला नाही.
गणपतचा घेतला ताबा
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक वंदना सोनुने, कांतीलाल केदारे, विनोद पाटील व गणपतची आई सुंदरबाई भिल्ल बुधवारी कानपूरात दाखल झाले. किदवई नगरातील सुभाष चिल्ड्रन होममध्ये मुलगा गणपतला पाहताच आईने त्यास मिठी मारत आसवांना वाट मोकळी करून दिली. तीन महिन्यांपासून आईपासून ताटातूट झालेल्या गणपतलाही अश्रू आवरणे कठीण झाले. गुरुवारी दुपारी कानपूर शहरातील कल्याणपूर बालकल्याण समितीकडून गणपतचा पोलीस पथकाने कायदेशीर ताबा घेतला.