कोथळीत तीन ठिकाणी घरफोड्या ; पावणे चार लाखाचा ऐवज लंपास

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील कोथळी येथे 2 जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून तीन लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेसह दागिने व ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. दिनेश कडू राणे (31, कोथळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 जूनच्या रात्री कोथळी गावातील नितीन सुरेश सरोदे यांच्या उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी शिरून घरफोडी केली तर जे.ई.स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विष्णू राणे यांच्या बंद घराच्या कडीकोयंडा तोडून आतील रोख रक्कम व दागिने लंपास केले. तसेच भास्कर तुळशीराम राणे यांच्या घरात देखील अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरफोडी केली. तिन्ही ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी तीन लक्ष 75 हजार रुपये रोख रकमेसह दाग दागिने व ऐवज लंपास केले. तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळुंके करत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात घरफोड्यांचे सत्र वाढले असून शेती शिवारातील ठिबक नळ्या इलेक्ट्रिक केबल चोरीने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून होणार्‍या चोर्‍या रोखाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.