कोथळी येथे बंद घर फोडले : साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगर : तालुक्यातील कोथळी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील चार लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
विनोद धोंडू शिंदे (34, रा.कोथळी, ता.मुक्ताईनगर) हे वरणगाव फॅक्टरीत नोकरी असून आपल्या कुटुंबीयांसह कोथळीत वास्तव्याला आहे. दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची चोरट्यांनी संधी साधली. घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स आणि 90 हजार रुपयांची रोकड असा एकूण चार लाख 83 हजार 170 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक परवीण तडवी करीत आहे.