मानवतेला काळिमा फासणार्या कोपर्डीतील त्या भीषण घटनेला सव्वावर्षे लोटलीत. आता संपूर्ण महाराष्ट्र न्यायासाठी न्यायव्यवस्थेकडे मोठ्या आशेने पाहत आहे. या खटल्यात पीडितेच्या बाजूने लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय कणखरपणे बाजू मांडल्याने त्या तीन नराधमांना फाशीचीच शिक्षा मिळेल, अशी आशा वाटते. पीडितेवर बलात्कार करून अतिशय क्रूरपणे तिला मारणारे नराधम न्यायालयाकडे जीवदान देण्याची विनंती करताना दिसले. याच नराधमांकडे ती निष्पाप बालिका जेव्हा सुटकेसाठी याचना करत होती तेव्हा त्यांना तिची दया आली नव्हती. स्वत:चा मृत्यू समीप येऊ लागताच दयेची भीक मागणारे हे नराधम फासावर लटकतील तेव्हाच कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल तसेच समाजातील अन्य विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवरही वचक बसेल.
13जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये एका निष्पाप मुलीवर तीन नराधमांनी अमानुष म्हणावा असा शारीरिक, लैंगिक अत्याचार केला. तिचे हातपाय मोडून तिची नृशंस हत्या केली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी एखाद्या नरपशुलाही लाजवेल, अशी कृत्ये त्या पीडितेच्या मृतदेहासोबत केलीत. गावातील एका मुलाने हा प्रकार पाहिला नसता तर नराधम हाती लागणे अवघड होते. पोलिसांनी या नराधमांना तातडीने ताब्यात घेतले. सुरुवातीस या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. पण, आरोपी ज्या समाजातील होते त्या समाजानेही त्यांना पाठीशी न घालता त्यांना योग्य ती शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. मराठा समाजानेही आरक्षणासाठी राज्यभर काढलेल्या अनेक मोर्चांमध्ये कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सातत्याने लावून धरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रकरणाकडे लक्ष दिले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हा खटला देण्यात आल्याने पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार, अशी आशा त्याचवेळी निर्माण झाली होती. सध्या या प्रकरणातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सलग दोन दिवस शेवटची सुनावणी झाली. आरोपींची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी फाशीऐवजी जन्मठेप द्यावी, अशी विनंती केली. आरोपी हे कुटुंबाचा एकमेव आधार आहेत, असे न्यायालयापुढे सांगितले गेले. बुधवारी पीडितीच्या बाजूने अॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडताना मात्र न्यायालयाला अतिशय प्रभावीपणे पटवून दिले की, या तीनही नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यावी. हे नराधम सज्ञान आहेत. त्यांना फाशीची शिक्षा दिली नाही, तर त्याचा चुकीचा संदेश समाजात जाईल आणि अशाप्रकारचे गंभीर गुन्हे करणार्यांवर वचक राहणार नाही. अॅड. निकम यांनी मांडलेली ही बाजू रास्तच आहे. जर अशा धडधाकट, सज्ञान आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली गेली तर त्याचा निश्चितपणे चुकीचा संदेश समाजात गेल्याशिवाय राहणार नाही हे उघड सत्य आहे. राज्यात अगोदरच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मागील काही वर्षांपासून प्रचंड वाढले आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये तर बलात्कार आणि महिलांवरील खुनीहल्ल्यांचे प्रकार सर्रास घडत आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. दिवसाढवळ्या महिलांवर हे नरपशु झडप घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशी स्थिती या राज्यात असताना कोपर्डीसारख्या प्रकरणातील नराधमांना योग्य शिक्षा मिळाली नाही तर गुन्हेगारांचेच धैर्य वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कोपर्डी प्रकरणातील नराधमांवर कोणतीही दयामाया न दाखवता न्यायालय योग्य ती शिक्षा करेल, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे.
कोपर्डी गावातील दलित वस्तीत राहणारे जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या नराधमांनी केलेल्या या नीच कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. संतापाची लाट राज्यभर उसळली होती. दुर्दैवाने या प्रकरणाला त्यावेळी जातीय किनार लावली गेली होती. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यास जातधर्म नसतो हेच सत्य आहे. अगदी कोपर्डीसारखीच एक घटना याच अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑगस्ट 2014 रोजी घडली होती. या घटनेतही तीनच नराधम होते. लोणी-मावळा येथे तिघांनी नववीतील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला अतिशय निर्घृणपणे ठार मारले होते. संतोष लोणकर (34), मंगेश लोणकर (30) व दत्तात्रय शिंदे (27) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनीही या मुलीचा पाठलाग करून तिला पकडले व अत्याचार केला. पीडित मुलीच्या नाकातोंडात चिखल कोंबून संतोष लोणकरने मुलीच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसले तर मंगेश लोणकरने मुलीच्या डोक्यात दगड घातला. दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर चिखल टाकला होता. अगदी कोपर्डी प्रकरणातील नराधमांप्रमाणे या नराधमांनीही क्रौर्याची परिसीमा गाठली होती. या तीनही नराधमांना मागच्याच आठवड्यात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपींच्या जातीचा उल्लेख त्यावेळी झाला नव्हता, हे येथे विशेष नमूद करावेसे वाटते. या नराधमांना कोपर्डीचे प्रकरण घडण्यापूर्वी जर फाशीची शिक्षा सुनावली गेली असती तर कदाचित कोपर्डीतील नराधम असे कृत्य करण्यास धजावले नसते असे वाटते. अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमांचे खटले वेगाने चालवून त्यांना ताबडतोब शिक्षा सुनावण्याची गरज आहे. कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेलीच तरी पुढे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज अशा वाटा उरत असल्याने ते फासावर कधी लटकणार यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, विकृतवृत्तीचे नराधम पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करण्यास धजावू नयेत एवढीच अपेक्षा. त्यासाठी आपल्या व्यवस्थेनेही न्याय देण्याची प्रक्रिया गतीने पार पाडली पाहिजे. येत्या 29 नोव्हेंबरला कोपर्डीच्या नराधमांना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, ही सर्वांचीच मागणी आहे. या मागणीचा न्यायालयानेही गांभीर्याने विचार करावा, अशी आम्हीही न्यायदेवतेस विनवणी करत आहोत.