नगर : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींवर शनिवारी न्यायालयाच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या हल्लेखोरांना रोखले. पोलिसांनी याबाबत चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्याच येत आहे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना शनिवारी सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. सुनावणी संपल्यानंतर त्यांना पुन्हा नेण्यात येत होते. त्याच वेळी शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरातील वातावरण तंग बनले होते. या प्रकारामुळे आरोपी न्यायालयाच्या आवारात पळून जाऊन लपून बसले. या प्रकारामुळे पोलिसांचीही काही क्षण तारांबळ उडाली. मात्र, ड्यूटीवर असलेल्या चार पोलिसांनी वेळीच हालचाल करत हल्लेखोरांना रोखले. यात पोलीस कॉन्स्टेबल रवी टकेल यांनी हल्लेखोरांचा वार हाताने अडवला. त्यात टकले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी अशी सतर्कता दाखवत या चौघांना जागेवरच ताब्यात घेतले. हल्लेखोरांकडे कोयता आणि अन्य धारदार शस्त्रे होती.
राजेंद्र पाटील, बाबुराव वाळेकर, अमोल खुणे आणि गणेश खुणे या चौघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौकशी उशिरापर्यंत सुरू होती. या चौघांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शिवबा ही संघटना जालन्याची असल्याचे समजते. कोपर्डी प्रकरणी नवनाथ पाखरे यांची साक्ष पूर्ण झाली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे.
दरम्यान या घटनेमुळे कोर्टाच्या आवारात अनोळखी इसमास येऊ न देण्याच्या सूचना देखील या खटल्यातील सरकरी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी पोलीस अधिक्षकांना दिल्या आहेत. एवढेच नाही तर यापुढील काळात न्यायालयाच्या आवारात अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. निकम यांनी दिली.