अहमदनगर – कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणानंतर कोपर्डीतील दलितांना जबरी मारहाण करून त्यांच्यावर 395 कलम अंतर्गत दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगत दलितांवरील हे अन्यायकारक खोटे गुन्हे काढून टाकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी बुधवारी अहमदनगर चे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना सुचना केल्या. तसेच यासंबंधी सामाजिक न्याय विभागाला निर्देश दिले असून गृहविभागाला देखील सूचना दिल्या आहेत.
ना. आठवले यांनी सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा अधिकारी पोलीस प्रशासन यांची बैठक घेऊन अहमदनगर मधील दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे अधिकारी वर्गाला सूचना केल्या. कोपर्डीत दलित-सवर्ण समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोपर्डीत कायम स्वरूपी पोलीस ठाणे उभारावे आणि दलितांवरील दरोड्याचे खोटे गुन्हे काढून टाकावेत अशी मागणी करणारे निवेदन कोपर्डीतील दलित बांधवांच्या आठवले यांना दिले.