कोपर्डीसारखे प्रकार थांबणार कधी?

0

दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण घडले तेव्हा देश हादरून गेला होता. संतापाचा कडेलोट झाला होता. कारण नराधमांनी केलेले ते कृत्य काळीज पिळवटून टाकणारे होते. देशभरात लोकांनी मोर्चे काढले आणि त्या नराधमांच्या फाशीची मागणी केली. या प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याने दिल्लीच्या निर्भयाला न्याय मिळाला. आता महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती, कोपर्डीच्या निर्भयालासुद्धा न्याय कधी मिळणार याची? मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांवरून अहमदनगर जिल्हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील झाल्याचे दिसून येते. येथे घडलेली काही प्रकरणे तर बिघडलेल्या सामाजिक मानसिकतेचीच उदाहरणे म्हणता येतील. त्यातही कोपर्डीमधील प्रसंग म्हणजे विकृतीचा कळसच! मात्र, समाजातील अशा गुन्हेगारांकडेही पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात जातीय दृष्टिकोनातून पाहिले गेले.

कोपर्डीप्रकरणी खटला न्यायालयात सुरू आहे. त्या नराधमांना कठोर शिक्षा होईल; तेव्हाच कोपर्डीच्या निर्भयाला खरा न्याय मिळेल. नराधमांना फासावर लटकवा, या मागणीसाठी आतापर्यंत राज्यात अनेक मोर्चे निघाले आहेत. पण, दिल्लीतील निर्भया प्रकरणाचा विचार करता महाराष्ट्रातील या प्रकरणाला दुर्दैवाने जातीवादाची किनार लावली गेली. काही लोकांनी त्याचे भांडवल करून समाजात तेढ निर्माण करण्याचाही लाजिरवाणा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडवून आणला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी विकृत मानसिकतेतून केलेल्या या कृत्याला जातीय भावनेतून पाहणे हे संतापजनक आहे; कारण गुन्हेगारांना जात नसते. काही राजकारण्यांनी या प्रकरणातसुद्धा जमेल तेवढा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. विकृत मनोवृत्ती हीच गुन्हेगारांची ओळख असते, हे तथ्यही मंडळी विसरली. असे असताना कोपर्डीचे प्रकरण मात्र जाती-धर्माच्या तराजूत जाणीवप पूर्वक टाकले गेले. कुठल्याही समाजातील मुलगी ही आपली मुलगी आहे, ही भावना जोपर्यंत समाजमनात रुजत नाही तोपर्यंत कोपर्डीसारख्या प्रकरणांना आळा बसणे कठीण आहे.

कोपर्डी बलात्कारासारखी प्रकरणे पुन्हा घडू नयेत, असे वाटत असेल तर त्यासाठी पोलीस दल, सामाजिक संस्था आणि प्रत्येक समाजबांधवाने प्रयत्न केले पाहिजेत, अशा गुन्हेगारी आणि विकृत मानसिकता असणार्‍यांवर योग्यवेळी योग्य उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. काही लोक तर दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, यासाठी टपूनच बसले आहेत. कोणतेही प्रकरण असो; त्यांना त्यामध्ये जात आणि धर्मच दिसतो. मुळात अशा प्रवृत्ती समाजाला मोठा कलंक आहेत. अशा लोकांना खरे तर कुठल्याही घटनेचे सुख-दु:ख नसतेच. त्यांना फक्त त्यांची दुकाने चालवायची असतात. परंतु, समाज क धी-कधी अशा लोकांच्या चिथावणीखोर विचारांना बळी पडतो आणि निर्भयासारख्या प्रकरणालासुद्धा जातीयतेची किनार मिळते. समाजातील प्रत्येक स्त्री ही आमची बहीण किंवा मुलगी आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवी. राज्यात बलात्काराचे प्रमाण मागील काही वषार्र्ंपासून झपाट्याने वाढले आहे. या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ही पोलिसांसाठी डोकेदुखी असली तरी समाजासाठीसुद्धा चिंताजनक आहे. एखाद्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आणि अन्य प्रकरणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गुन्हेगारांना भय राहिले नसल्यानेच ते खुलेआम असे गुन्हे करताना दिसतात. कोपर्डी प्रकरणाततर आरोपींनी क्रौर्याची परिसीमाच गाठली होती. असे प्रकार रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची कठोरतेने अंमलबजावणी करावीच लागेल, न्यायव्यवस्थेनेही थोडेसे चौकटीबाहेर येणे गरजेचे आहे. म्हणजे, नराधमांना त्यांच्या पापाची फळे मिळतीलच व वचक बसेल. दिल्लीतील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर तिला न्याय मिळाला. पण, काही दिवसांतच त्याच घटनेची पुनरावृत्ती कोपर्डीत घडली. आता कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळण्यासाठी प्रतीक्षा आहे. उद्या त्याही नराधमांना फाशी होईल. पण पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची खात्री कुणी देईल का?

– अजय सोनावणे, सहसंपादक
जनशक्ति, पुणे
9423824260