अमदनगर । राज्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी बुधवारी जिल्हासत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे सुनावणीला गैरहजर होते. सुरक्षा व्यवस्था नसल्याने ते येऊ शकत नसल्याचे त्यांच्या वतीने कोर्टात दिलेल्या अर्जात म्हटले. त्यावर कोर्टाने चौकशी केली असता त्यांनी कोर्टाला चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. यावर कोर्टाने आरोपी संतोष भयाळ याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पोलिसांनी खोटे उघड केले
पोलिसांनी कोर्टात सांगितले की, दोन सुरक्षारक्षक वकील बाळासाहेब खोडपे यांना आणायला गेले होते. परंतु, ते आले नाही. आरोपीच्या वतीने चुकीची माहिती दिल्याचे लक्षात आल्याने कोर्टाने आरोपी संतोष भवाळ याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्या वेळी बचाव पक्षाचे एकमेव साक्षीदार रवींद्र चव्हाण हेही सुनावणीला अनुपस्थित होते. मुंबईतील मुसळधार पावसात अडकल्याने येऊ शकत नसल्याचे त्यांच्या वतीने दिलेल्या अर्जात म्हटले होते. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती.