कोपर्डी पीडितेच्या स्मारकावरून मराठा संघटनांत उभी फूट!

0

अहमदनगर : कोपर्डीत नृशंस लैंगिक अत्याचार व निर्घृण खुनाला बळी पडलेल्या पीडितेच्या स्मारकाचे गुरुवारी भैय्युजी महाराज यांच्याहस्ते वर्षश्राद्धानिमित्त अनावरण होत असतानाच, या अनावरणावरून संभाजी ब्रिगेड व छावा या दोन मराठा संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. हे स्मारक न हटविल्यास गुरुवारचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला असून, छावाने मात्र हा पीडितेच्या कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे, अशी भूमिका घेत स्मारक होईलच असे ठणकावले आहे. त्यामुळे कोपर्डीत पुन्हा एकदा तणावसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, सकल मराठा समाजानेही कोपर्डीतच मराठा मोर्चांची आढावा बैठक व 9 ऑगस्टरोजीच्या मुंबईतील मूकमोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष कोपर्डीकडे लागलेले आहे.

दोन्ही संघटनांच्या परस्परविरोधी भूमिका
पीडित मुलीचे स्मारक हे अपमान आणि अत्याचाराचे प्रतिक आहे. त्यामुळे या मुलीची स्मारकामुळे वारंवार बदनामी होत राहील, अशी वैचारिक भूमिका घेत संभाजी ब्रिगेडने स्मारक न हटविल्यास भैय्युजी महाराज यांचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला आहे. तर छावा संघटनेने मात्र या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. स्मारक उभारणे हा संबंधित कुटुंबीयांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यात संभाजी ब्रिगेडने ढवळाढवळ करू नये, असा इशारा छावाने दिला. या स्मारकाच्या अनावरणासाठी भैय्युजी महाराज कोपर्डीत येत असल्याने व हा विषय दोन मराठा संघटनांनी वादाचा केल्याने कोपर्डीसह नगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गुरुवारी कोपर्डीत काय होते, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पीडित मुलीचे वर्षश्राद्ध असल्याने अनेक नेते गावात येणार आहेत.

सकल मराठा समाजाही आढावा, नियोजन बैठक
कोपर्डी घटनेनंतरच मराठा क्रांती मोर्चांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे पीडित मुलीला आदरांजली वाहण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे नेते कोपर्डीत येणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, कोपर्डीतील भैरवनाथ भक्त निवासात सकल मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक होणार असून, या बैठकीतील मुंबईतील 9 ऑगस्टच्या मूकमोर्चा संदर्भात नियोजन केले जाणार आहे. बैठकीच्या सुरुवाती पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली जाणार असून, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चांचा आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मोर्चासह आंदोलनाची पुढील दिशाही या बैठकीत ठरवली जाणार आहे.

पीडित मुलीच्या स्मारकाच्या वादात न पडता सकल मराठा समाज हा मुंबई मोर्चा व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोपर्डीत राज्यव्यापी बैठक घेणार आहे. 9 ऑगस्टचा मोर्चा यशस्वी करणे हेच आमचे ध्येय आहे. कोपर्डीतील बैठक ही फार पूर्वीच निश्चित केलेली असल्याने भैय्युजी महाराज व इतर लोकांनी स्मारकाचा मुद्दा नेमका याच तारखेला का उपस्थित केला? हा प्रश्नच आहे.
संजीव भोर, नेते सकल मराठा समाज