कोपर्डी प्रकरण : तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा

0

अहमदनगर : संपूर्ण देशाचे लक्ष ज्या खटल्याकडे लागले होते त्या कोपर्डी बलात्कार आणि नृशंस खूनप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकताच नगर सत्र न्यायालयाबाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. या खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे आणि तिचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी क्रमांक 2 संतोष भवाळ आणि आरोपी क्रमांक 3 नितीन भैलुमे यांना बलात्कार करणे आणि कट रचणे यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या आरोपींना विनयभंग, बलात्काराचा कट रचणे, बलात्कारासाठी उद्युक्त करणे अशा विविध गुन्ह्यांसाठी जन्मठेप आणि 20 हजारांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास या आरोपींची जन्मठेप तीन महिन्यांनी वाढणार आहे. संतोष भवाळ याने विविध युक्त्या वापरून न्यायालयाच्या कामकाज लांबवण्याचा प्रयत्न केला होता, यासाठी त्याला 18 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे, हा दंड न भरल्यास त्याला तीन महिने जास्त शिक्षा भोगावी लागेल. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता न्यायाधीश केवले न्यायालयात दाखल झाल्या. त्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली. अवघ्या सहा मिनिटांच्याआत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

न्यायालयाने अशी सुनावली शिक्षा!
कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास दीड वर्षे हा खटला चालला. या दीडवर्षाच्या युक्तीवादानंतर बुधवारी अवघ्या 6 मिनिटात न्यायाधीशांनी निकाल दिला. खचाखच भरलेल्या न्यायालयात टाचणी पडल्याचाही आवाज येईल, अशी शांतता होती. न्यायाधीश सुवर्णा केवले सकाळी 11 वा. 23 मिनिटांनी न्यायालयात दाखल झाल्या. तीनही आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांना कठड्यात बसवण्यात आले होते, त्यांना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. आरोपी नंबर 1 जितेंद्र शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले. मग न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावे आणि वय वाचून दाखवले. त्यानंतर न्यायाधीशांनी लगेचच शिक्षा वाचण्यास सुरुवात केली. कटकारस्थान, पोक्सो, बलात्कार आणि हत्या अशा विविध आरोंपानुसार शिक्षा सुनावली. सर्वात आधी विविध कलमांनुसार जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर मग कलम 302 अर्थात खून आणि कलम 376 अर्थात बलात्कार यासाठी तीनही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला ज्यावेळी दोषी धरण्यात आले होते, त्यावेळी तो म्हणाला होता शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय, शिक्षाही शिक्षाच असते. मात्र हाच जितेंद्र शिंदे न्यायालयासमोर हात जोडून उभा होता. ज्यावेळी न्यायालयाने आरोपींना फाशी सुनावली त्यानंतर पीडित मुलीच्या आईने एकच हंबरडा फोडला. न्यायाधीशांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलेे मोबाईल, दुचाकी यांचा लिलाव करण्याचेही आदेश दिले. त्याची जी रक्कम असेल, ती सरकारदप्तरी जमा होईल.आजच्या सुनावणीसाठी आरोपींपैकी एकाचाही वकील उपस्थित नव्हता. केवळ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हेच उपस्थित होते.

दोषी उच्च न्यायालयात जाऊ शकतात!
तिन्ही दोषींना कोणती शिक्षा झाली याबद्दल विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, कोपर्डी खटल्यातील तिन्ही दोषींना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा ठोठावण्यात आली. तिन्ही दोषींना बलात्कार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सगळ्या दोषींना या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून, त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायालयात आले. त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल एक हजार पोलिस तैनात करण्यात आले. तसेच कर्जत आणि कोपर्डी गावातही बंदोबस्त वाढवण्यात आला होती.

घटनेनंतर 1 वर्षे चार महिन्यात निकाल
नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करुन घटनेनंतर 85 दिवसांनी म्हणजेच 7 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेनंतर 1 वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती तर जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अ‍ॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला होता.

आरोपींना फाशीच का? अ‍ॅड. निकम यांनी दिली 13 कारणे
अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला होता. युक्तिवादादरम्यान ते म्हणाले की, या घटनेतील आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांनी बलात्कार केला नाही व ते निर्दोष आहेत असे आपण मानत नाही. उलट त्यांनी आरोपी शिंदे याला मदत केली आहे. त्याची दुचाकी लपविण्यात भैलुमे व भवाळ यांनी मदत केली आहे. घटनेनंतर दोन आरोपींमध्ये मोबाईलवर झालेले 30 सेकंदांचे संभाषण हाही महत्त्वाचा पुरावा आहे. आरोपींनी दृष्कृत्य केले आहे. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला. आरोपीच्या गळ्यातील माळ त्या ठिकाणी सापडली. पीडितेला त्यांनी 150 फुटांपर्यंत ओढत नेले. आरोपी शिंदेने तिच्यावर अत्याचार केला. गुन्हे सिद्ध झाल्यानंतर आरोपींना कोणताही पश्चात्ताप झाला नाही. आरोपींनी न्यायालयामध्ये दयेची विनंती करण्यापेक्षा न्यायालयात ‘एक दिवस शिक्षा काय किंवा हजार दिवस शिक्षा काय, शिक्षा ही शिक्षाच असते’ असे उर्मट वक्तव्य केले होते. अशी एकूण 13 कारणे निकम यांनी सादर केली होती. त्यांचा युक्तिवाद हा या आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास अत्यंत महत्वाचा ठरला आहे.

छकुली.. तुझी आठवण येते गं!
आज माझ्या मुलीला न्याय मिळाला असे मानून मी न्यायालयासह सार्‍यांचे आभार मानते. मात्र जोपर्यंत तिघांना फासावर लटकवले जात नाही तोपर्यंत मी लढत राहणार, असा निर्धार बोलून दाखवत असताना पीडितेच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी तिनही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. दरम्यान, दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरीदेखील ते उच्च न्यायालयात दाद मागू शकतात असे निकालावेळी स्पष्ट करण्यात आले होते. माझ्या छकुलीचे हाल करणार्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून सारा मराठी समाज एकवटला होता. मुख्यमंत्र्यांनीदेखील स्वत: लक्ष घातले, समाजाने आंदोलने केली, आज न्यायालयाने तीनही दोषींना फाशीची शिक्षा देऊन माझ्या छकुलीला न्याय दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते, अशा पीडितेच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर असा प्रसंग कुणावर ओढावू नये म्हणून संपूर्ण समाजाने असेच एकत्र यावे. कुणावर असा प्रसंग ओढावलाच तर मी स्वत: तेथे धावून जाईल, असेही त्या म्हणाल्या. तर मी या निकालानंतर न्याय झाला असे मी मानतो अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली.

कोपर्डी बलात्कार, हत्याकांड घटनाक्रम
13 जुलै : 2016 रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून
14 जुलै : मध्यरात्री गुन्हा दाखल, कर्जत बंद, आरोपी जितेंद्र शिंदेला श्रीगोंदे येथून पकडले
14 जुलै : आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको
14 जुलै : पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
15 जुलै : कोपर्डीत चूल बंद, श्रीगोंदे, जामखेडमध्येही बंद
15 जुलै : मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदेला पोलिस कोठडी
16 जुलै : कर्जत येथे सर्वपक्षीय रास्ता रोको
16 जुलै : खटल्यासाठी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी
16 जुलै : नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना अटक
17 जुलै : भैलुमे, भवाळवर न्यायालयात शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
18 जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तीव्र पडसाद
18 जुलै : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्ह्यात सर्वत्र बंद
19 जुलै: विधानसभेत विरोधकांकडून आरोपीला फाशी देण्याची मागणी
19 जुलै : जिल्हाभर मोर्चे, प्रशासनाला निवेदने सादर. आरोपींच्या पुतळ्याचे दहन
21 जुलै : प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी कोपर्डीत जाण्यापासून रोखले
23 जुलै : रामदास आठवले यांना न भेटण्याचा पीडितेच्या कुटुंबियांचा निर्णय. त्यामुळे दौरा रद्द. दलित नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांना कोपर्डीत जाण्यास पोलिसांचा मज्जाव
24 जुलै : कमालीची गुप्तता पाळीत मुख्यमंत्र्यांचा कोपर्डी दौरा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम खटल्याचे कामकाज पाहणार असल्याची घोषणा
9 ऑगस्ट : सकल मराठा समाजाचा औरंगाबादला राज्यातील पहिला मोर्चा. आरोपींना फाशीची मागणी
23 सप्टेंबर : सकल मराठा समाजाचा नगरला भव्य मोर्चा
7 ऑक्टोबर : घटनेच्या 85व्या दिवशी तीनही आरोपींविरुद्ध 70 साक्षीदारांचा समावेश असलेले 320 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्याकडून दाखल
20 डिसेंबर : कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरु
1 एप्रिल 2017 : शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींवर सशस्त्र हल्ला
24 मे : कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण
16 ऑक्टोबर : अंतिम युक्तिवाद सुरु
8 नोव्हेंबर : अंतिम युक्तिवाद संपला
18 नोव्हेंबर : आरोपी दोषी
21, 22 : दोन्ही बाजूच्या वकीलांकडून युक्तिवाद
29 नोव्हेंबर : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

.. तर ती वाचली असती!
कोपर्डीप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा गावातील मित्रांसमवेत हौसमजा करणारा युवक. त्याची दोन लग्ने झालेली आहेत. त्याने यापूर्वी महिलांची छेडछाड केली होती. पुणे जिल्ह्यातील भिगवण व श्रीगोंदा तालुक्यात त्याने महिलांची छेडछाड केली होती. परंतु, त्या महिलांनी पोलिस ठाण्यात जाणे टाळले होते. त्यामुळे शिंदे याचे धाडस वाढत गेले आणि त्याने कोपर्डीच्या पीडितेचा घात केला. या महिलांनी वेळीच तक्रार केली असती तर कदाचित कोपर्डीच्या पीडितेचा जीव वाचला असता. कोपर्डीची घटना घडली त्या दिवशी जितेंद्र शिंदे त्याचा मित्र संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्यासोबत दारू पीत बसला होता. अत्याचार झाल्याच्या घटनास्थळपासून एक किलोमीटर अंतरावर दारू प्यायल्यानंतर तो पुन्हा घटनास्थळापासून 50 फूटावर दारू पिण्यास बसला. आजोबांकडे आलेली पीडिता पुन्हा सायकलहून जाताना नराधम शिंदेची तिच्यावर नजर गेली. जोडीदारासोबत त्याने तिचा पाठलाग केला. रात्री साडेसात वाजण्याची वेळ असताना आजोबांपासून काही मीटर अंतरावर गेल्यानंतर या श्वापदांनी तिला रस्त्याच्या बाजूला ओढून नेले. पीडितेने नशेबाजांना कडाडून विरोध केला. परंतु, पशुत्त्व संचारलेल्या या नराधमांसमोर तिचा निभाव लागला नाही आणि कोपर्डीकांड घडले.

वेदना हीच शक्ती समजा : दिल्लीच्या निर्भयाची आई
सुरुवात चांगली झाली, पुढे लढत राहा, न्याय नक्की मिळेल, तुमची वेदना हीच शक्ती समजा आणि लढा द्या, असेच मी कोपर्डीच्या निर्भयाच्या पालकांना सांगू इच्छिते असे दिल्लीतील निर्भयाच्या आईने कोपर्डी निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले. दिल्लीतील निर्भयावरील बलात्कार-हत्येचा घटनेला पाच वर्षे झाली, मात्र आरोपी अजूनही जीवंत आहेत. त्यांच्या फाशीची अंमलबजावणी झालेली नाही. कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणात तर केवळ एकाच कोर्टाने फाशीची शिक्षा दिली आहे. सध्या ती पण थोडी नाही, अजून मोठी लढाई लढायची आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष निघून जातात, असे म्हणत दिल्लीतील निर्भयाच्या आईने हतबलता व्यक्त केली.