अहमदनगर : कोपर्डी प्रकरणात विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (25), संतोष गोरख भवाळ (30) व नितीन गोपीचंद भैलुमे (26) या नराधमांना दोषी ठरवले होते. या दोषी आरोपींच्या शिक्षेबाबत मंगळवारपासून युक्तीवादाला सुरुवात झाली. कोपर्डी प्रकरण हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही. त्यामुळे मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा देऊ नये, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर नितीन भैलुमेच्या वकिलांनीही नितीनला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे. जितेंद्र आणि नितीन या दोघांच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
मुख्य आरोपीच्या वकीलांनाही बाजू मांडली
नितीन भैलुमेचेे वकील प्रकाश आहेर म्हणाले, नितीन हा बीएससीचा विद्यार्थी असून तो शेवटच्या वर्षात होता. गरीब आणि दलित कुटुंबातून आलेला नितीन हा कुटुंबाचा एकमेव आधार आहे. त्याच्याविरोधात प्रत्यक्षदर्शी पुरावादेखील नाही. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या वतीने वकील योहान मकासरे यांनी युक्तीवाद केला. जितेंद्र शिंदे हादेखील गरीब कुटुंबातून आला आहे. जितेंद्र हा विवाहित असून, त्याच्या पत्नीसाठी जितेंद्र हाच एकमेव आधार आहे. हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा नाही. त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. दोषींची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसल्याचे दोघांच्या वकिलांनी सांगितले. संतोष गोरख भवाळचे वकील उद्या न्यायालयात युक्तीवाद करतील. यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांची बाजू मांडतील. यानंतर न्यायालय दोषींना शिक्षा सुनावणार आहे.
तिला मी मारले नाही : मुख आरोपी
या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारले नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. यासंदभात त्याचे वकील अॅड. योहान मकासरे म्हणाले, मी सरकारकडूनही आरोपी नंबर एकचे काम पाहतोय, आणि फाशी न देता जन्मठेप द्यावी, अशी विनंती केली आहे. आरोपी म्हणत होता, मी मारले नाही. पण आजची सुनावणी यासंदर्भात नव्हतीच. फाशी की जन्मठेप, हे सांगायचे होते. आम्ही जन्मठेपेची मागणी केली आहे.
दोषींना फाशीच द्यावी
शनिवारी न्यायालयाच्या निकालानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दोषींना जन्मठेपेऐवजी फाशीच द्यावी अशी मागणी केली. त्या नराधमांनी माझ्या मुलीचे लचके तोडलो. त्या तिघांचेही लचकेच तोडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. कोपर्डीत 13 जुलै 2016 रोजी नववीत शिकणार्या 15 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी आजोबांच्या घरी जात असताना नराधमांनी दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला आणि गावातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली होती.