भुसावळ । कत्तलीच्या इराद्याने गुरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कोम्बिंगमध्ये उघड झाले असून 24 गुरांची सुटका करण्यात आली तर एका गुराचा मात्र मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालकासह गुरांची वाहतूक करणार्या मालकास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. वाहनातील गुरांची जळगावच्या पांझरापोळ गो-शाळेत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, 13 रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी मध्यप्रदेशातून औरंगाबादकडे गुरे नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. आरोपींकडे गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला परवानाही नसल्याने कत्तलीसाठीच गुरांची वाहतूक केली जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी गजाआड
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कोम्बिंग ऑपरेशन सुरु असतांना रविवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुलीवर आयशर (क्र. एमपी 12 जीए 0733) हा भरधाव वेगाने जामनेरकडे जात असतांना पोलिसांनी अडवला. वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात 24 गुरांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे उघड झाले. गुरे वाहतुकीचा परवाना नसल्याने वाहनचालक वसीमखान सलीमखान (42, गुलशन कॉलनी, सात नंबर गल्ली, मशिदीबाजुला, खंडवा, मध्यप्रदेश) व गुरेमालक अबुलेस उस्मान गनी (35, हिरापुरा, जहाजतदेव, गिरणा रोड, मालेगाव) यांना अटक करण्यात आली.
24 गुरांची सुटका; एकाचा मृत्यू
पोलिसांनी वाहनातून 2 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 14 म्हशी, एक लाख रुपये किंमतीचे 10 म्हशींचे पारडे व तीन लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले. गुरांच्या निर्दयी वाहतुकीमुळे गुदमरुन एका गुराचा मृत्यू झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
कारवाईत यांचा होता सहभाग
पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश बरडे, दिलीप निकम, विनोद सपकाळे, युनुस शेख, नंदकिशोर परदेशी आदींनी ही कारवाई केली. नंदकिशोर परदेशी यांच्या फिर्यादीवरुन वाहनचालक व गुरे मालकाविरुध्द बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून औरंगाबाद येथे गुरांची वाहतूक होत होती.
हद्दपार आरोपी जाळ्यात
हद्दपार आरोपी भुसावळात तलवारीसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली. सचिन ज्ञानदेव भगत (28, श्रध्दानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव होते. रविवारी पहाटे 2.30 वाजता शहरातील श्रध्दानगर भागात आरोपी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास पथकाने अटक केली. दीपक जाधव यांनी बाजारपेठ पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटा अडकला जाळ्यात
बाजारपेठ पोलिसांचे शहरातील विविध भागात कोम्बिंग सुरु असतांनाच रविवारी मध्यरात्री 2 वाजता शहरातील दिनदयालनगर भागात एक संशयीत पोलिसांना पाहताच पळाल्याने त्यास पकडण्यात आले. संशयिताच्या अंगझडतीत स्क्रू ड्रायव्हर व पेंचीस आढळल्याने तो चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयीत आरोपी दीपक राजू पवार (21, इंदिरानगर, भुसावळ) अटक करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, लतिफ शेख, जयेंद्र पगारे, सुधीर विसपुते, विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण आदींच्या पथकाने केली.
गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहरात यापुढेदेखील कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांकडून राबवण्यात येईल. गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.
-नीलोत्पल, सहा.पोलीस अधीक्षक