“कोयता स्टाईल” चे शालेय विद्यार्थ्यांना आकर्षण

0

पालक वर्गाने विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता

पिंपरी – चिंचवड : आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर अभ्यास करतो का वेगळ्या मार्गाने त्याची वाटचाल सुरू आहे याबाबत अनेक पालक अनभिन्न असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ३ दिवसीय शालेय परिसर पाहणीमध्ये (सर्वेक्षण) दिसून आले.

प्राधिकरण – आकुर्डी- निगडी परिसरामध्ये सर्वात जास्त शाळा महाविद्यालयांची संख्या आहे.प्रत्येक सेक्टर मध्ये सरासरी २ च्या संख्येने शाळा आहेत.प्रत्येक शाळेत १००० ते १५०० च्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ८ वी ते १० वी च्या शालेय विद्यार्थ्यांचा विचार केला तर सरासरी ह्या विद्यार्थ्यांचे वय १४ ते १७ मध्ये आहे. सध्या अनेक शाळेच्या आसपास चे वातावरण पाहिले तर अतिशय विदारक सत्य समीतीच्या पाहणी सदस्य टीम ला निदर्शनास आले.बऱ्याच प्रमाणात शालेय प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे टोळके भांडणाच्या अवस्थेत दिसून आले. पुणे पब्लिक स्कूल गंगानगरच्या प्रवेशद्वारावर तर काही मुले कोयता खुलेआम काढून भांडणे करताना आढळून आली. त्याच सुमारास प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पाहणी पथकातील संतोष चव्हाण आणि शुभम वाघमारे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ३ विद्यार्थी पळून गेले. दोघेजण सापडले. समिती सदस्यांनी त्यांना निगडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदरची पाहणी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी प्राधिकरण परिसरातील सेक्टर २८ मधील, म्हाळसाकांत,पुणे पब्लिक,सीएमएस,डी वाय पाटील, इंग्लिश स्कूल शाळा सेक्टर २७ अ मधील गुरू गणेश,कॅम्प एज्युकेशन, सिटी प्राइड सेक्टर २५ मधील ज्ञानप्रबोधिनी,कीर्ती विद्यालय, निगडी परिसरातील महापालिका शाळा,आकुर्डी परिसरातील सरस्वती शाळा असे विभागवार पाहणी केली त्यामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये वादावादी,भांडणे निदर्शनास आली. अनेक ठिकाणी प्रवेशद्वारावर फ्लेक्सबाजी सुद्धा दिसून आली. शाळेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाची एकटाच असल्याने दमछाक होत असल्याचेही निदर्शनास आले.विद्यार्थिनीना छेडछाड व शेरेबाजीचा सामना करावा लागतो हे सुद्धा दिसून आले. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे प्रमुख चौकांमध्ये शाळा सुटतेवेळी व भरतेवेळी वाहतूक कोंडी व असुरक्षित पार्किंग चा सुध्दा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.

पालकांचे दुर्लक्ष, शालेय कर्मचारी शिक्षकांची अनास्था, सुरक्षा रक्षकांची कमतरता,पालक संघाचे दुर्लक्ष, शालेय परिसरात खोट्या मुखवटाधारक टग्यांचे, भाईंचे वाढते प्रस्थ अश्या महत्वाच्या कारणांमुळे सध्या विध्यार्थी मोठया प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत आहेत. अशी विदारक परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरासाठी तसेच पालकांसाठीही धोक्याची घंटा आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सदरच्या, अहवालाबाबत असे स्पष्ट केले की,” आकुर्डी आणि गंगानागर ह्या जास्त घनता असलेल्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी भांडणे व विवाद करताना दिसून येत आहेत.परंतु आता हत्यारांचा आणि कोयत्याचा वापर जर अल्पवयीन मुले करू लागली तर विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ लागला आहे. भविष्यात अनिष्ठ गोष्टी घडण्याला प्रतिबंध घालायचा असेल. वाढत्या शालेय गुन्हेगारी वृत्तीला आळा घालायचा असेल तर समाज-पालक जागृती, विद्यार्थी समुपदेशन, आणि प्रबोधन महत्वाचे.”

सदरच्या सर्वेक्षण पाहणीमध्ये समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, संदीप सकपाळ, मंगेश घाग, राम सुर्वे, राजकुमार कांबीकर, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, बाबासाहेब घाळी, विजय जगताप, बळीराम शेवते, राजू येळवंडे, अमित डांगे, अमोल कानु, अजय घाडी, नितीन मांडवे यांनी सहभाग घेतला.