कोयत्याने गळा चिरून पत्नीची हत्या, आरोपी पसार

0

भिवंडी । घरगुती वाद तसेच व्यावसायिक कारणामुळे आलेले नैराश्य यातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना भिवंडीतील कामतघर परिसरातील चौधरी कम्पाउंडमध्ये घडली आहे. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आर्थिक मंदीचा फटका, त्यातच घरात मुलाचे ठरलेले लग्न या वादातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. घरात कोणी नसल्याने संतापलेल्या पतीने लोखंडी कोयत्याने पत्नीचा गळा चिरून हत्या केली. मृत महिलेचा मुलगा प्रकाश झा (37) याच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती विनोद झा (52) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर तिचा पती विनोद झा (60) हा पसार झाला आहे. आरोपी विनोद हा नातेवाइकांसह भिवंडीतील कामतघर परिसरातील चौधरी कंपाउंडमध्ये अष्टविनायक हौसिंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर राहतो. तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गेल्या महिन्यापासून ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात मंदीमुळे त्याला आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते, अशी माहिती मुलगा प्रकाश याने पोलिसांनी दिली. त्यातच प्रकाशचे लग्नही ठरले होते. यामुळे पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी सकाळच्या सुमाराला घरात कोणी नसताना पत्नी मालती व पती विनोदमध्ये मुलगा प्रकाश याच्या ठरलेल्या लग्नाच्या विषयावरून वाद झाला. हा वाद एवढा विपोकाला गेला, की पती विनोदने रागाच्या भरात लोखंडी कोयत्याने पत्नीचा गळा चिरला.

मुलगा प्रकाश हा शिक्षक असल्याने तो सकाळीच खासगी शिकवणीला गेला होता. आरोपीची आई कौसल्या ही पार्क तलाव परिसरात फिरायला गेली होती. ती घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून सून मालतीची वाट पाहत शेजार्‍यांकडे बसून राहिली. एक तास उलटूनही मालती न आल्याने कौसल्याने नातू प्रकाशला फोन करून बोलावले. त्याने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला. तेव्हा आपली आई मालती हिची गळा चिरून हत्या झाल्याचे व ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. ताबडतोब वडील विनोद झा यांना मोबाइलवर संपर्क केला असता, त्यांचा मोबाइल घरातच आढळला. तोपर्यंत शेजार्‍यांनीच याची माहिती नारपोली पोलिसांस दिली. घरातील मुख्य खोलीतील भिंतीवर रक्त उडाल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, घरातील सर्व मौल्यवान वस्तू जागेवर असल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सैफन मुजावर व नारपोली पोलिसांनी भेट देऊन हाताचे ठसे तपासण्यासाठी ठाणे येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक बोलावले. ते आल्यानंतर घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला होता. या घटनेनंतर मृत मालती झा हीचा पती विनोद हा घरी परतला नव्हता.