कोयत्याने वार करुन तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

0

पूर्ववैमनस्यातून प्रकार : चिंचवडच्या महात्मा फुले नगरातील घटना

पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून एका 18 वर्षीय तरुणावर दोघाजणांनी कोयत्याने आणि चाकूने वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना बुधवारी (दि.25) रात्री नऊच्या सुमारास चिंचवड येथील महात्मा फुले नगरमध्ये असलेल्या जय भवानी एंटरप्रायझेसच्या मागील बोळात घडली. सुरज प्रभाकर हराळे (वय 18, रा.चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. आरोपींची नावे अशी : अक्षय रमेश महाजन (वय 18) आणि दिनेश बाळासाहेब शिंदे (वय 20, दोघेही रा. महात्मा फुले नगर, चिंचवड). याप्रकरणी जखमीची आई कान्होपात्रा हराळे (वय 40, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हातावर, खांद्यावर वार
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुरज हराळे आणि आरोपी अक्षय महाजन या दोघांमध्ये 18 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी काही किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन अक्षय आणि त्याचा साथीदार दिनेश या दोघांनी बुधवारी (दि.25) रात्री नऊच्या सुमारास चिंचवड येथील महात्मा फुले नगर मध्ये असलेल्या जय भवानी एंटरप्रायझेसच्या मागील बोळात सुरज याला अडवले. यावेळी अक्षय याने सुरज याच्या गळ्यावर कोयत्याने प्राणघातक वार केला. तसेच दिनेश याने त्याच्या जवळील चाकूने सुरज याच्या डाव्या हातावर व उजव्या खांद्यावर वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. सुरजवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी पोलीसांनी आरोपी अक्षय आणि त्याचा साथीदार दिनेश याला अटक केली आहे. पोलीस उप निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करत आहेत.