शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकर्यांना मिळणार
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील कोयाळी भानोबाची येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी वार्ताफलकाचे अनावरण करण्यात आले. येथील प्रगतिशील शेतकरी सदाशिव भाडळे यांच्या हस्ते या फलकाने अनावरण झाले. शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकर्यांना व्हावी, कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती, समृद्ध शेती योजनेंतर्गत विविध योजना आणि कृषी संदेश शेतकर्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा वार्ताफलक उभारण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कोयाळीच्या सरपंच बानुबाई काळे, उपसरपंच बापूसाहेब सरोदे, माजी सरपंच वृंदा गायकवाड, कृषी सहाय्यक जयश्री पाडेकर, ग्रामविकास अधिकारी बी. बी. माने, विकास भिवरे, गोपाळ बनसोडे, रामदास कोळेकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. या संकल्पनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, कृषी तंत्रज्ञान प्रसार, पीक उत्पादन वाढ, सूक्ष्म सिंचन योजनांची माहिती शेतकर्यांना मिळणार असल्याने या उपक्रमाचे स्वागत होत आहे.