यावल- तालुक्यातील कोरपावली येथे 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कोरपावली येथील तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे यांना बुधवारी अटक करण्यात आली होती तर न्यायालयाने त्यांना 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानंतर त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.डी.जी.जगताप यांनी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद केला. सविता या आपल्या पतीसह मुंबई येथे पसार होण्याच्या बेतात असताना पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी एसटी बसचा पाठलाग करून त्यांना अटक केली होती. कोरपावली ग्रामपंचायतीत आठ लाख 46 हजार 500 रूपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे व ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांच्या विरूध्द 20 नोव्हेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल आहे. सुनील पाटील हे पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.