कोरपावलीत घरफोडी ; तीन ठिकाणी प्रयत्न फसला
सोन्याच्या दागिन्यांसह 70 हजारांचा ऐवज लांबवला : घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये पसरली भीती ः गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची अपेक्षा
यावल : तालुक्यातील कोरपावली येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 70 हजारांचा ऐवज लांबवला. दरम्यान, गावातील आणखी चार घरात चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
बंद घराला टार्गेट
कोरपावली येथील रहिवासी असलेल्या सायराबी बिस्मिल्ला पटेल या मागील दोन दिवसांपासून आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्ताने जळगाव येथे नातेवाईकांच्या घरी गेल्या असताना सोमवार, 7 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामानाची नासधूस करून कपाटातील ठेवलेल्या बॅगेतील मौल्यवान पंधरा ग्रॅम सोन्याचे दागिने व 14 हजार 800 रुपये रोख अशा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज लांबवला.
तीन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न
कोरपावली गावाच्या बाजुस असलेल्या महेलखेडी गावातदेखील एक तर कोरपावली गावातील तीन घरांमध्ये चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याची माहिती आहे. महेलखेडी गावात काही घरांच्या आजु-बाजूच्या घरांच्या दरवाजाच्या बाहेरील कडी बंद करून महेलखेडीचे माजी सरपंच विलास भागवत पाटील, माजी पंचायत समिती सभापती शोभा विलास पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या दाराची कडी उचकुन घरात प्रवेश करण्याच्या बेतात असताना ग्रामस्थाला जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला. याबाबतची माहिती यावल पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार कोरपावली येथे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, पोलिसस नाईक संजय देवरे, घटनेची पाहणी करून पंचनामा केला.