हाँगकाँग: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही याचे काही रुग्ण आढळले आहे. दरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली आणि अग्रगण्य कंपनी गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलची हाँगकाँग, तैवान आणि मेनलँड चाइनामधील सर्व कार्यालये बंद असणार आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील सरकारने नागरीकांना प्रवास टाळण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनेनुसार कंपनीने सर्व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं गुगलच्या प्रवक्त्याने The Verge सोबत बोलताना सांगितले. याशिवाय कर्मचाऱ्यांना १४ दिवस घरुन काम करण्याची मूभाही देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून तेथे आतापर्यंत एकूण १३० हून अधिक जणांना मृत्यू झालाय. मध्य हुबेई प्रांतात एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, विषाणूची लागण झालेल्या निश्चित रुग्णांची संख्या आता सहा हजार झाली असून पुढील दहा दिवसांत चीनमधील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आता भारतातही शिरकाव केल्याची चिन्हे आहेत. या जीवघेण्या विषाणूने होणाऱ्या आजाराची लक्षणं असलेले काही संशयित मुंबई आणि पुण्यात आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.