मुंबई दिनांक ३०: दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.
आपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.