कोराना : अमेरिकेत हाहाकार; इटलीत मृत्यूचे तांडव

0

न्यूयॉर्क – संपूर्ण जगात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिका हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने गेल्या २४ तासात इटलीमध्ये ९७० पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून, एका दिवसात ५६९ लोकांचा मृत्यू झाला. यासह येथे एकूण मृत्यूची संख्या ४,९३४वर गेली आहे.

जगात आतापर्यंत ५ लाख ९१ हजार ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २६ हजार ९९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख २९ हजार ७९० जण उपचारानंतर बरे झाले आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्याच्या यादीत इटली दुसर्‍या स्थानी आहे. इटलीत आतापर्यंत ८६ हजार ४९८ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ९ हजार १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात इटलीत ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.