येरवडा । कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे दगडफेक करून अनेक विनाकारण फोडलेली वाहने याचे पडसाद उपनगर भागात उमटले असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ विविध भागात पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने व दुकाने बंद ठेवून निषेध करण्यात आला. यादरम्यान संतप्त झालेल्या महिला जमावाने विश्रांतवाडी पोलीस चौकीला घेराव घातल्याने परिसरात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विविध संघटनांकडून निषेध
या घटनेचा लष्कर-ए-भीमासंघटनेचे संस्थापक सचिन धिवार,नगरसेवक अविनाश साळवे,राहुल भंडारे,मराठवाडा विकास संघटनेचे भालचंद्र कसबे, रिपाई (कवाडे गट), प्रकाश भालेराव, रिपाई (प्रेसिडियम), राज बोखारे, बसपाच्या मेनका कराळेकर, आरती भालेराव, राष्ट्रीय परिवर्तन संघटनेचे सुखदेव डावरे, राकेश वाल्मिकी आदींनी या घटनेचा निषेध केला आहे.
व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली
विश्रांतवाडी भागातील शांतीनगर परिसरात आंदोलन सुरू केले. तर भीमनगर येथील महिलांनी आंदोलनात सहभागी होऊन या घटनेचा निषेध केला. दरम्यान मिलिंद एकबोटेंच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्यास पसंती दिली. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट दिसून येत होता. विद्यालय, महाविद्यालयांना तात्काळ सुट्टी देण्यात आली. विश्रांतवाडी परिसरातील मुकुंदराव आंबेडकर चौकात वाहनांची वर्दळ नव्हती. येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर, शीला साळवे भाजी मंडई या परिसरात व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. आंदोलकांनी दत्त मंदिर चौक, इको गार्डन, म्हाडा सोसायटी आदी भागातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
शासकीय वाहनांसह खासगी वाहने पेटवली
पुणे-नगर रोड महामार्गावर पेरणे फाटा येथे असलेल्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला येत असताना याच मार्गावर सणसवाडी व कोरेगाव-भीमा परिसरात काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करून शासकीय वाहनांसह खासगी वाहने पेटवून देण्याचा प्रकार घडल्याने याचे पडसाद दुसर्या दिवशी उपनगर भागातील विश्रांतवाडी, लोहगाव, धानोरी, येरवडा, वडगाव शेरी, खराडी भागात उमटल्याचे चित्र मंगळवारी (दि.2) सकाळी अकरानंतर पाहायला मिळाले.
परिसराला छावणीचे स्वरूप
परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश गावडे, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, गुन्हे शाखेचे दिलीप शिंदे, वाहतूक नियंत्रण कक्षेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंतामणी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी परिसराला पोलिसांचा छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलीस निरीक्षक संजय नाईक (पाटील) गुन्हे शाखेचे विलास सोंडे तर चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक पेट्रोल पंप व्यावसायिकांनी पेट्रोल पंप बंद ठेवल्याने नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली. विश्रांतवाडी भागातील आळंदी रोड पोलीस चौकीला महिलांनी वेढा घातल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर विविध पक्ष व संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेऊन दोषी असलेल्या गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
भेकराईनगर एसटी व पीएमपी बसवर दगडफेक
हडपसर । पुणे-सासवड रस्त्यावर अज्ञात तरुणांकडून भेकराईनगर येथे एका एसटी व पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. भेकराईनगर येथील पोलिस चौकीसमोरच ही घटना घडली. तातडीने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दोन्ही वाहने भेकराईनगर येथील जकात नाक्यावर हलविण्यात आली. भिमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
एसटी स्वारगेटहून बारामती तर बस कात्रज उंड्रीमार्गे हडपसरच्या दिशेने जात होती. यावेळी तोंडाला रूमाल बांधलेल्या व हातात निळे झेंडे घेतलेल्या तरुणांनी दोन्ही वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर ते पसार झाले. संबंधित तरुण ज्या दिशेने गेले, त्या दिशेने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
– विष्णू पवार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर