पुणे : कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवून आणणारे दंगलखोर पाच दिवस उलटले तरी अजूनही मोकाटच असून पोलिसांची कारवाई वेगळ्याच दिशेने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. वढु बुद्रुक येथून सुरू झालेले हे प्रकरण प्रथम राज्यात आणि नंतर दिल्लीपर्यंत पसरले. परंतु, अजूनही राज्य सरकार व राज्याच्या गृह विभागाला जाग आलेली नाही. शुक्रवारी कोरेगाव-भीमा गावातील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. बाहेरच्या संघटनांनीच येथे येऊन हिंसाचार घडवला, पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त न ठेवल्याने दंगल भडकली, असा दावा ग्रामस्थांनी केला. स्थानिक ग्रामस्थ बाहेरच्या व्यक्ती, संघटनांकडे बोट दाखवत असताना पुणे ग्रामीण पोलिस मात्र त्यादृष्टीने तपास करताना दिसत नाहीत.
आमच्यात कुठलाही वाद नाही
1 जानेवारीच्या घटनेला पोलिस प्रशासनास जबाबदार आहे. आम्ही अनेकवर्षांपासून एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहोत. उलट कोरेगाव-भीमावर अन्याय होतो आहे. मागच्या तीन दिवसांपासून लाईट-पाणी नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. कोरेगाव-भीमामध्ये मोठया प्रमाणावर तोडफोड, जाळपोळ झाली. लवकरात लवकर शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरवर्षी इथे लाखोंच्या संख्येने लोक येतात. शासनाने आवश्यक बंदोबस्त न ठेवल्याने हिंसाचार घडला. 1 जानेवारीला माता, महिलांवर अत्याचार झाले. थरकाप उडवणार्या गोष्टी आमच्याडोळ्यासमोर घडल्या, असे मराठा समाजातील एका महिला प्रतिनिधीने सांगितले. या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी मराठा समाजातील महिला प्रतिनिधीने केली.
घटनेमागील सुत्रधारांना अटक करा
शौर्यस्तंभाचे 200 वे वर्ष असल्याने देशभरातून 5 लाखांपेक्षा जास्त बांधव येथे येणार होते याची दखल घेऊन सुरक्षेची आवश्यक व्यवस्था करणे प्रशासनाचे काम होते मात्र प्रशासनाने ते केले नाही. सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले त्याचमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला असा आरोप डॉक्टर वर्षा शिवले यांनी यावेळी केला. तसेच देशभरातल्या दलित आणि मराठा बांधवांना त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आमच्या गावात राहणार्या लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. काही समाजकंटकांमुळे आणि चिथावणीखोर लोकांमुळे आमच्या गावाची नाहक बदनामी झाली असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमागे जे लोक आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.