कोरेगाव भीमातील हिंसाचार पूर्वनियोजित!

0

ना. रामदास आठवले यांचा गंभीर आरोप

पुणे : 1 जानेवारीरोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. आठवले बोलत होते.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही!
ना. आठवले म्हणाले, सणसवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना संरक्षण दिले गेले पाहिजे, या संदर्भात ग्रामीण पोलिसांना सूचना केल्या आहेत. या संपूर्ण हिंसाचारात 9 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होणार नाही. दलितांना आपले मित्र मानून काम करा, असाही सल्ला आठवले यांनी दिला. कोरेगाव भीमाची दंगल म्हणजे काही प्रमाणात पोलिसांचे अपयश होते, असे सांगून ना. आठवले यांनी या दंगलीसाठी पोलिसांवरही ठपका ठेवला. कोरेगाव भीमा व परिसरात 1 जानेवारीरोजी हिंसाचार उसळला. त्यानंतर या हिंसाचाराचे पडसाद 2 जानेवारीला महाराष्ट्रभर उमटले. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीरोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा प्रकरण म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. तसेच जिग्नेश मेवाणीला चांगला नेता व्हायचे असेल तर त्याने उलटसुलट भाषण करू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला.

आंबेडकरांनी केली होती भिडे, एकबोटेंच्या अटकेची मागणी
कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तर मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड झाली होती. या हिंसाचारामागे हिंदुत्त्ववादी संघटना आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. संभाजी भिडे गुरुजी यांची शिव प्रतिष्ठान संस्था आणि मिलिंद एकबोटे समस्त हिंदू एकता आघाडी या दोन संस्था या हिंसाचारामागे आहेत, असे आंबेडकरांनी म्हटले. तसेच महाराष्ट्र बंदची हाक देत या सगळ्या हिंसाचाराचा निषेध नोंदवला होता. भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.