कोरेगाव-भीमाप्रकरणी रामदास आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवार वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आठवले यांनी कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर या प्रकरणात ज्यांचा हात असेल त्यांच्यावर जरुर कारवाई केली जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना दिले आहे. मात्र, कुणालाही अटक करण्याआधी सगळे पुरावे गोळा करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना सांगितले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

त्या बाहेरच्या व्यक्ती, संघटना कोण?
कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी शुक्रवार पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच बाहेरच्या व्यक्ती, संघटना यांनी गावात येऊन हिंसाचार घडवून आणल्याचे म्हटले होते. पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास चूकीच्या दिशेने सुरू असल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार त्या बाहेरच्या व्यक्ती, संघटना कोण? याचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

ग्रामस्थांची नुकसान भरपाईची मागणी
गावात हिंसाचार कोणी घडवला, हे सरकारने शोधून काढावे. तो कोणत्याही समाजाचा नागरिक असो, कारवाई झालीच पाहिजे. हिंसाचारात गावकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या अनुचित प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. प्रशासनाने पुरेशी सुरक्षा दिली नाही, असा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. कोरेगाव-भीमा गावाची बदनामी थांबवावी आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे ग्रामस्थ म्हणाले. गावातील दोन्हीकडील ग्रामस्थांमध्ये चांगले संबंध असल्याचा दावाही यावेळी ग्रामस्थांनी केला होता.