कोरेगाव भीमा घटनेचे भुसावळ विभागात पडसाद

0

भुसावळात गालबोट, दोन बस फोडल्या ; अनेक दुकानांवर दगडफेक

भुसावळ : कोरेगाव भीमा घटनेनंतर बुधवारच्या महाराष्ट्र बंदला भुसावळ विभागात कडकडीत प्रतिसाद मिळाला मात्र भुसावळ येथे निघालेल्या बहुजन समाजाच्या मोर्चानंतर जमाव हिंसक झाल्याने जामनेर रोडवरील काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली तर दोन बसेसवर दगडफेक झाल्याने पाच प्रवासी जखमीर झाले तर त्यातील एक गंभीर असल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. जमावाने नाहाटा चौफुलीवर एका चालकास मारहाण केली तर जामनेर रोडवरील एक्सीस बँकेच्या एटीएमची काच फोडली तसेच या रस्त्यावरील काही टपर्‍या तसेच दुचाकी उलथवण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच धाव घेत लाठीचार्ज करीत जमावाला पांगवले. पोलिसांनी धरपकड सुरू केली असून तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. भुसावळ येथे 200 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या.

यावलमध्ये पाच बसच्या काचा फोडल्या
यावल शहराबाहेर पाच बसेसवर दगडफेक करण्यात आली असून काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. साने गुरूजी विद्यालयाचे स्नेहसंमेलन सुरू असताना जमावाने येथे खुर्च्यांची मोडतोड केली. रोशन कोल्हे नामक विद्यार्थी या प्रकारात जखमी झाला आहे. पोलीस प्रशासनाने बंदोबस्त नाकारल्यानंतरही स्नेहसंमेलन घेण्यात आले हे विशेष !. भुसावळ विभागातील सावद्यासह रावेर, मुक्ताईनगर, बोदवडला कडकडीत बंद पाळण्यात आला.