कोरेगाव-भीमा दंगलीमागे फडणवीस सरकारचे हात; शरद पवारांचे गंभीर आरोप !

0

मुंबई : पुण्याजवळील कोरेगाव-भीमा दंगलीमागे भाजप सरकार असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षाकडून होत होते. पुन्हा हा आरोप झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे.

“पोलिसांनीही अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले आहेत, असाही आरोप पवरांनी पोलिसांवर केला. माझे स्पष्ट मत आहे की तात्कालीन सरकारने पोलिसांसोबत मिळून षडयंत्र रचलेलं होते. तसेच हिंसा केलेल्या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असेही पवारांनी पत्रात म्हटले आहे.