पुणे । कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे. भाजप सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर खापर फोडले असल्याची टीका शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे. भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीने कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018रोजी झालेल्या तयार केलेला अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात हा माओवादी विचारांच्या संघटना, खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणार्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता, यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष मांडण्यात आला.
पालकमंत्री अपयशी ठरले
रावत यांनी पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून वढू येथून तीन किलोमीटर भगवे झेंडे घेऊन कोरेगांव भीमाकडे जाणार्या जमावाला पोलिसांनी वेळीच रोखून जमावातील लोकांना इतर ठिकाणी हालविले असते तर कोरेगांव भीमा येथील हिंसाचार टळला असता असे म्हटले होते. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी याप्रकरणामध्ये राज्य शासनाची दिशाभूल केली आहे, असा आरोप ही त्यांनी केला होता. या आरोपाला पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने उत्तर देण्यात असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हे अल्पसंख्यांक समाजचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणूनबुजून खापर फोडले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्या पक्षाच्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी जाणून बुजून भाजपचे खासदार त्यांना बदनाम करत आहेत व जनतेची दिशाभूल करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही दंगल घडवून आणली असा आरोप करत आहेत असेही काँग्रेसच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या हिंसाचारात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री भेटले नसून पालकमंत्रीही गिरीश बापटही ही परिस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरल्याचेही यात म्हटले आहे. थेट सत्ताधारी भाजपवर काँग्रेसच्या आरोपामुळे हा विषय अधिक संवेदनशील बनत चालला असून इतर राजकीय पक्षही त्यात उडी मारण्याची शक्यता आहे.
आरोपींच्या गटातील लोकांचा रास्ता-रोको
सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामस्थ व महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करीत सणसवाडी ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. आत्महत्या केलेल्या पूजा सकट हिचे वडील सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सणसवाडीच्या माजी सरपंच आशा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, रामभाऊ दरेकर यांच्यासह इतर चार ते पाच जणांना सकट यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. दुपारंनतर जनजीवन सुरळीत झाले होते. मृत पूजाचे वडिल सुरेश सकट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या गटातील दरेकर यांच्या नात्यातील एका महिलेने सकट यांच्याविरोधात आपल्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पूजाच्या खुनाशी दंगलीचा संबंध नाही
कोरेगाव भीमा येथील पूजा सकट या तरुणीचा मृतदेह 21 एप्रिल रोजी विहिरीत आढळून आला होता. मात्र, या गूढ मृत्यूचा कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीशी संबंध जोडून राजकारण पेटवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मृत पूजाच्या भावानेच स्पष्टीकरण देत दोन्ही घटनांचा एकमेकांशी काहीच संबंध नसल्याचे सांगितले. दंगलीच्या दुसर्या दिवशी जमिनीच्या वादातून काही लोकांनी आमचे घर व कार्यालय जाळले होते. या घटनेची पूजा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती, या वैयक्तिक वादातून तिचा खून केला असावा, असा संशय भाऊ जयदीप सकट याने व्यक्त केला. जयदीप म्हणाला, 2 जानेवारी रोजी जमावाने आमचे घर, तसेच घराजवळील लहुजी सेनेचे कार्यालय पेटवून दिले. त्या वेळी मी व पूजा प्रत्यक्षदर्शी होतो, परंतु जमलेल्या जमावाला भिऊन आम्ही ट्रॅक्टरजवळ आसरा घेतला होता. त्यानंतरही आरोपींकडून धमक्या येत होत्या. दरम्यान, 20 एप्रिल रोजी रातंजन (ता.कर्जत) येथे यात्रेसाठी मी व वडील गेलो होतो. आई, बहीण बायको घरीच होते. दुसर्या दिवशी पूजाचा मृतदेह एका विहिरीत सापडला. तिच्या मृत्यूस धमक्या देणारेच कारणीभूत आहेत, असा आरोपही जयदीपने केला.
घर जाळणारे आरोपी येरवडा कारागृहात
दरम्यान, कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे जमाव बंदीचा आदेश असतानाही घराची तोडफोड करून ते जाळल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी दोघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. विलास श्रीधर वेदपाठक (60), गणेश विलास वेदपाठक (24, दोघेही रा. नरेश्वर वस्ती, कोरेगाव भीमा, शिरूर) अशी येरवडा कारागृहात रवानगी केलेल्या दोघांची नावे आहेत. नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कडराव दरेकर, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात, विशाल काळुराम दरेकर (रा. सणसवाडी) आणि सुभाष गणपत धावटेरा (रा. वाडेगाव फाटा, कोरेगाव भीमा, शिरूर) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयदीप सुरेश सकट (24, रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 जानेवारी रोजी घडला. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोन आरोपींनी जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामीनावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.