कोरेगाव भीमा शांत कधी होणार?

0

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी उसळलेल्या दंगलीची आग अजूनही शांत होत नाही. सातत्याने दंगलीशी संदर्भात काहीतरी नवीन विषय पुढे येत असल्याने कुणीतरी ही आग सतत धगधगत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय येतो आहे. दंगलीतील सर्व आरोपींना अजूनही अटक झालेली नसताना काही दिवसांपूर्वी पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधितांवर पोलिसांनी धाडी टाकून त्यांची चौकशी केली. तत्पुर्वी याच दंगलीतील एक संशयित संभाजी भिडे गुरूजी यांच्या समर्थनासाठी पुण्यात निदर्शने करण्यात आली होती. समाजातील शांतता सतत भंग करण्याचाच प्रयत्न आहे, असे आता वाटू लागले आहे. त्यातच याच दंगलीतील प्रत्यदर्शी असलेल्या एका तरूणीचा संशयस्पद मृत्यू झाल्याने आता वेगळे वळण लागले आहे.

कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा येथे राहणारे सकट कुटुंबिय अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरत होते. अखेर या कुटुंबियाला मोठा फटका बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे कुटुंबिय विशेष पोलिस महासंचालकांपासून स्थानिक पोलिस अधिकार्‍यांना आपल्याला धोका असल्याबाबत सांगत होते. मात्र, कुणीही त्यांची ही तक्रार गांभीर्याने न घेतल्याने सकट कुटुंबातील एका मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. 1 जानेवारी 2018 च्या दंगलीत सुरेश सकट यांचे घर समाजकंटकांनी जाळले होते. सकट यांना जयदीप, पूजा ही दोन मुले आहेत. या दोघांनी घर जाळणार्‍या समाजकंटकांना पाहिले होते. म्हणूनच या दोघांमधील पूजा हीचा मारेकर्‍यांनी काटा काढला, असे सकट यांनी पोलिसांना सांगितले आहे. दंगलीत घर भस्मसात झाल्यानंतर हे कुटुंब वाडा येथे राहण्यास गेले होते. तेथील घरमालकानेही घर खाली करण्यास सांगितल्याने या कुटुंबाच्या पाया खालील वाळूच सरकली होती. त्यातच त्यांच्या तरूण मुलीचा येथील विहिरीत मृतदेह सापडल्याने सकट कुटुंब हवालदिल झाले आहे. दंगलीपुर्वी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी या कुटुंबाने पोलिसांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. काही लोकांना त्यांचे कोरेगाव भीमा येथील घर खुपत होते. दंगलीचा फायदा घेत सकट कुटुंबाचे घर जाळण्यात आले, असे सकट कुटुंबियांचे म्हणणे आहे. दंगलीमध्ये घर जाळताना पूजाने आणि तिच्या भावाने समाजकंटकांना पाहिले असतानाही पोलिसांनी काहीच केले नाही. शिवाय, या कुटुंबाने संरक्षण मागूनदेखील पोलिसांनी दुर्लक्ष केले, हे सर्व गंभीर आहे. मुळातच कोरेगाव भीमा दंगलीतील पुणे ग्रामीण पोलिसांची भूमिका सुरूवातीपासूनच संशयास्पद आहे. स्थानिक नागरिक आजही दंगलीचा ठपका पोलिसांवर ठेवत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना शाब्बासकी देऊन त्यांना क्लीन चीट देत आहेत.

कोरगाव भीमा दंगलीतील एक साक्षिदार असलेल्या पूजा सकट हिचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाल्याने पुन्हा एकदा वातावरण गढूळ झाले आहे. पोलिसांनी या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. कोरेगाव भीमा आणि परिसरात पूजाच्या मृत्यूनंतर पुन्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत. दंगलीनंतर वातावरण निवळत असताना आणि सामाजिक एकोपा सुरळीत होत असताना पुन्हा कुणीतरी हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. येथील स्थानिक सांगतात की, 1 जानेवारीची दंगल झाल्यानंतर कोरेगाव भीमा आणि परिसरात अनेक लहान मोठे गुन्हे घडत असल्याने गावाचे आणि परिसरातील वातावरण खराब झाले आहे. स्थानिकांना हे जाणवत असताना पोलिस निश्‍चिंत कसे राहू शकतात? पूजाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर दलित संघटनांनी त्याचा संबंध थेट दंगलीशी जोडल्याने वातावरण अधिकच ढवळले गेले. वास्तविक दंगलीच्या आडून कुणीतरी या कुटुंबाचे घर हडपण्याचा प्रकार तर केला नाही ना, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. दलित संघटनांनीही सबुरीने घेत खर्‍या समाजकंटकांना ताब्यात घेईपर्यंत संयम बाळगला पाहिजे. सामाजिक शांतता, सलोखा राखण्यासाठी सर्व समाजाने एकत्र आले तरच शांतता अबाधित राहू शकते. जसे जत्रेत हौशे, नवशे, गवशे असतात तसेच दंगलींमध्ये हात साफ करून घेणारे आणि जुने हिशेब चुकते करणारे अनेक असू शकातात. यासाठी पोलिसांनीही नेहमीप्रमाणे चालढकल न करता या संशयास्पद मृत्यूप्रकरणाचा जलदगतीने तपास करणे अपेक्षित आहे. ज्याप्रकारे कोरगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास सुरू आहे, ते पाहता पुणे ग्रामीण पोलिसांची प्रतिमा खराब होऊ लागली आहे.

एल्गार परिषदेचे आयोजन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेली कारवाई अशीच अनाकलनीय होती. 1 जानेवारीच्या दंगलीत मार खाणारे आणि मारणारे कोण? हेच पोलिसांना अजून कळलेले नाही का? दंगलीचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. पण, पुणे ग्रामीण पोलिसांनाच ते उपलब्ध होत नाहीत का? दंगलीची सुरूवात शोधण्याऐवजी पोलिस शेवट शोधत असल्याने तपासाची दिशा भरकटत असल्याचे दिसते. शिवाय, दंगलग्रस्त भागातील लोकांचे म्हणणे पोलिस समजावून घेत नसल्याचे दिसते. पूजा सकट हिचा मृत्यू कशामुळे झाला? तिने आत्महत्या केली की कुणी तिची हत्या केली? हे तपासात उघड होईलच. परंतु, त्यासाठी पोलिसांनी कुठलेही दडपण, दबाव न बाळगता तपास करणे गरजेचे आहे. अगोदरच देशातील समाजिक सलोखा बिघडत चालला आहे. दररोज जातीय, धार्मिक विद्वेशाची एक तरी घटना कानावर पडत आहे. महिला, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनाही भय वाटावे एवढ्याप्रमाणात वाढल्या आहेत. सोशल मीडियावर तर धार्मिक, जातीय द्वेष अखंडपणे सुरू आहे. कोरेगाव भीमासारखे प्रकरण सतत धगधगत ठेवल्याने वातावरण अधिकच बिघडू शकते. पोलिसांनी कोरेगाव भीमा प्रकरणातील खर्‍या सुत्रधारांना जेरबंद केले तरच हे प्रकरण लवकर शांत होईल. अन्यथा ते धगधगत राहून एखाद्या दिवशी पुन्हा पेट घेऊ शकते. म्हणूनच पूजा सकट या तरूणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे सत्य तातडीने उजेडात आणणे तितकेच गरजेचे आहे. उगाच संशयकल्लोळ वाढविणे योग्य नाही. पुण्यातील सत्यशोधन समितीने या दंगलीसंदर्भात प्रसिद्ध केलेला अहवाल म्हणूनच धक्कादायक ठरला आहे. या अहवालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.