कोरोनाचे संकट टाळण्यासाठी शनिदेवाकंडे भाविकांचे साकडे

दिवसभर भाविकांनी घेतले शनिदेवांचे दर्शन

नंदुरबार। तालुक्यातील शनिमांडळ येथे शनि अमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेवून अनेकांनी नवस स्फूर्ती केली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. यावेळी मंदिर ट्रस्टतर्फे प्रशासनाने घालुन दिलेल्या निर्बंधानुसार कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता. यावेळी अनेक भाविकांनी शनिदेवाकंडे ‘कोरोनाचे संकट टळो’ असे साकडे घातले आहे.

साडेसाती मुक्तपीठ म्हणून ओळख असणार्‍या खान्देशातील एकमेव शनि महाराजांचे मंदिर तालुक्याच्या ठिकाणाहून शनिमांडळ 18 कि.मी. अंतरावर आहे. दरवर्षी अमावस्येला येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे मंदिर ट्रस्टतर्फे यात्रोत्सव रद्द केला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव काहीसा कमी झाल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी नियमांची अट घालुन खुले केले होते. सकाळी 6 वाजेची महाआरती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या सदस्यांसह स्वयंसेवकांनी उत्फूर्तपणे लक्ष देवून कोणताही अनुचित प्रकार होवू न देता भाविकांना दर्शनासाठी सहकार्य केले. यानंतर दिवसभर नागरिकांनी शनिदेवांचे दर्शन घेतले. यादरम्यान अनेक व्यवसायिकांनी मंदिर परिसरात दुकाने थाटली होती.

साडेसातीची तीव्रता कमी होवुन मिळतेय मुक्तता
जिल्ह्यातून नव्हे तर मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून, जळगाव, धुळे येथून भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. याठिकाणी साडेसातीची तीव्रता कमी होवुन मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. दरम्यान याठिकाणी मंडपाची व्यवस्थाही केली होती. तसेच बाहेर गावाहून येणार्‍या भाविकांसाठी मंदिरालगत अभिषेकासाठी मंदिर ट्रस्टतर्फे मंडपाची व्यवस्था केली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच ग्रामस्थांसह युवकांनीही परिश्रम घेतले.

भाविकांसाठी पिठले अन् भाकरीचा महाप्रसाद
शनि अमावस्येनिमित्त परंपरेनुसार ग्रामस्थांंतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथील जिल्हा परिषद शाळेत बाहेर गावाहून येणार्‍या भाविकांसाठी पिठले आणि भाकराचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. या प्रसादामुळे अनेक भाविकांच्या व्याध्याही दूर होतात, असे जाणकार सांगतात. शनिमांडळ गावातील प्रत्येक घरातून बाजरीच्या भाकरीचा प्रसाद देण्यात येतो. यासाठी गावातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.