मुंबई: राज्यभरात आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साह साजरी होत आहे. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल’ आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. “शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
छत्रपतींमुळेच कोरोनाशी लढतांना प्रेरणा व जिद्द मिळत आहे असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये थोडी नाराजी होती. त्यातच सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम 144 लागू केलं आहे.