कोरोनामुळे आत्मनिर्भर होण्याचा संदेश मिळाला: मोदी

0

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील तळागाळातील समस्या आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सरपंचांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी चर्चा करत मार्गदर्शन केले. कोरोना महामारीने खूप काही शिकविले आहे. संकटाशी सामना करण्याची प्रेरणा कोरोनामुळे मिळाली असून आत्मनिर्भर होण्याची शिकवण ही कोरोनामुळे मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्तर मजबूत असल्यास लोकशाही अधिक मजबूत होईल. कोरोना विरुद्ध लढताना ग्रामपंचायतीने देखील आपले मोठे योगदान दिले आहे याचे कौतुकही मोदींनी केले. संकट काळात खरा कस लागतो. पोषण वातावरणात सामर्थ्य कळत नाही. खरी परीक्षा संकट काळातच असते असे सांगून मोदींनी मनोधैर्य वाढविला.

स्वामित्व योजना लागू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांशी संवाद साधताना प्राथमिक स्वरूपात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात स्वामित्व योजना जाहीर करत असल्याची घोषणा केली. या योजनेद्वारे गावातील संपत्तीची मॅपिंग होणार असून त्याची मालकी गावातील नागरीकांना दिली जाणार असल्याचे मोदींनी सांगितले.