कोरोनामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले होते. आता भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परिस्थिती कोरोनापूर्व काळाप्रमाणे सामान्य होतांना दिसत आहे. मात्र त्याचवेळी भारताची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागले आहे. मात्र यावेळी कोरोनामुळे नव्हे तर वायू प्रदुषणामुळे लॉकडाऊन लावावे लागले आहे. भारताची राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासळल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना एक आठवड्याची सुट्टी देण्यात आली आहे. खराब हवेमुळे आरोग्या धोका असल्याने ऑनलाइन क्लासेस घेण्याच्या सुचना दिल्लीतील शाळांना देण्यात आल्या आहेत. यावरून दिल्लीतील हवा किती दर्जाहीन आहे, याचा प्रत्यय येतो. सुप्रीम कोर्टाने प्रदुषणाविषयी केंद्र सरकारला फटकारले होते आणि प्रदुषणाला नियंत्रित करण्यासाठी इमरजेंसी प्लान सांगण्यात सांगितले होते. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंशिक लॉकडाऊन लावले. मात्र वायू प्रदुषणाची समस्या केवळ दिल्लीतच नसून मुंबईतही कायम आहे. जळगाव शहराबाबत बोलायचे म्हटल्यास, येथे रस्त्यांवरील खड्डे व त्यामुळे उडणारी धूळ हा कायम चिंतेचा व चिंतनाचा विषय राहिला आहे. मात्र महापालिका अजूनही या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे धुळीच्या विषयावरुन राज्य सरकारनेच येथे लॉकडाऊन घोषित करावा, असे वाटते. कारण त्याशिवाय महापालिका याकडे लक्ष देणार नाही.
कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊनमुळे दिल्लीसह देशभरातील शहरांच्या प्रदूषणाची पातळी खाली आली होती. इतकी की, पंजाबच्या जालंधरमधून हिमालयातील धौलाधार पर्वतराजीचे दर्शनही घडण्याइतकी द़ृश्यस्पष्टता आली; मात्र आता पुन्हा एकदा प्रदूषणाने आपले भयावह रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या दिवसेंदिवस विषारी हवेमुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. न्यायमूर्ती एनव्ही रमणा दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर एका याचिकेवर सुनावणी करत होते. त्यांनी सरकारला फटकारले आणि म्हटले की, परिस्थिती किती गंभीर आहे ते तुम्ही पाहत आहात. आपण आपल्या घरातही मास्क लावून फिरत आहोत. सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील शाळा सुरू करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाने तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. जसे की वाहने थांबवणे आणि दिल्लीत लॉकडाऊन लागू करणे. यानंतर दिल्ली सरकारने शाळा आठ दिवस बंद ठेवल्याचे जाहीर करून सरकारी कर्मचार्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रदूषणाची धोकादायक पातळी पाहून, तातडीची बैठक बोलावून हे अंशिक लॉकडाऊनचे निर्णय जाहीर करावे लागले. इतकेच नव्हे, तर आम्ही पूर्ण लॉकडाऊनचाही विचार करीत आहोत, हे सांगावे लागले. बांधकामावर तसेच खासगी वाहनांच्या वाहतुकीवर बंदीचाही सरकार विचार करीत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. हे सर्व उपाय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखेच आहेत. दिल्लीचे प्रदूषण गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय बनलेला आहे आणि त्याबाबत अद्यापही ठोस व दूरगामी उपाय केले नसल्याने आता ही वेळ आली आहे. हवेच्या प्रदूषणामुळे फुप्फुसांच्या कर्करोगासारखे गंभीर आजारच होतात, असे नाही, तर हृदयावर आणि मेंदूवरही त्याचे दुष्परिणाम होतात, हे सिद्ध झालेले आहे. हवा सुरक्षित असण्यासाठी ‘पीएम 2.5’ (सूक्ष्म धुलीकण) स्तर 60 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असावा लागतो. दिल्लीत शनिवारी सायंकाळी तो 381 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होता. एकंदरीत दिल्लीत श्वास घेणेही कठीण बनले असून जीवघेणी घुसमट सुरू आहे. यावर आता सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच गांभीर्याने विचार करून ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. मात्र या विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. आजही हा विषय केवळ चर्चासत्रांपुरता मर्यादित असल्याचे स्पष्टपणे जाणवते. याचीच किंमत चुकवावी लागल आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात नुकतीच कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबतची 26 वी शिखर परिषद झाली. जगभरातील नेत्यांनी या परिषदेत हवामान बदल व कार्बन उत्सर्जनाच्या धोक्यांचा ऊहापोह केला. या ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टी 26’ (कॉप 26) परिषदेत सर्वाधिक कार्बन उत्सर्जन असणार्या चीन, अमेरिका आणि भारताच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत भारताने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे (नेट झिरो कार्बन इमिशन) लक्ष्य ठेवल्याचे सांगितले. हवामान बदलाविषयीच्या या परिषदेचे सूप वाजल्यानंतर पंतप्रधान राजधानी नवी दिल्लीत आले त्यावेळीही राजधानीची हवा प्रदूषितच होती. आता तर प्रदूषणामुळे आठ दिवस शाळा बंद ठेवण्याची आणि लॉकडाऊनचा विचार करण्याची वेळ दिल्ली सरकारवर आली आहे. प्रदुषणाची समस्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित नाही. गत 48 तासापूर्वी मुंबईने आता दिल्लीलाही मागे टाकले आहे. मुंबईतील कुलाबा येथे हवेचा दर्जा दिल्लीहून खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. सिस्टम फॉर एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईतील कुलाबा येथे हवा 345 एक्यूआय नोंदली गेली आहे. जी अत्यंत खराब श्रेणी मानली जाते. तर दिल्लीतील हवेचा दर्जा 331 एक्यूआय इतका आहे. प्रदूषणामुळे अस्थमा आणि ब्रोंकायटिस असलेल्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. या काळात त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे वातावरणातील प्रदूषणाचे अनेक छोटे कण श्वसननलिकेत जातात. त्यामुळे लोकांना दम्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. जळगावकर या समस्येचा सामना गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. अलीकडच्या काही दिवसांमध्ये जळगाव शहरात श्वसन रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर वेळीच तोडगा न काढल्यास जळगाव शहरातही दिल्लीप्रमाणे लॉकडाऊन करण्याची वेळ येवू शकते, याचे भान महापालिकेने ठेवायला हवे.