कोरोनामुळे यंदा सखाराम महाराज संस्थानचा रथ आणि पालखी जागेवरच फिरणार

0

अमळनेर प्रतिनिधी-: सालाबादप्रमाणे यंदाही संत सखाराम महाराजांचा उत्सव शासनाचे नियमांचे पालन करूनच स्वरूप बदल करून होणार असल्याची माहिती संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूर अमळनेरचे गादीपती हभप प्रसाद महाराज यांनी दिली.

अखंड विश्वावर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांमध्ये असलेली भीती आणि यात्रेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यात्रोत्सव नदी पत्रात न भरता धार्मिक कार्यक्रम हे मंदिरात अंतर्गत पद्धतीने होणार आहे. तर महाराजांचा रथ हा मंदिरा पुढेच पाच फेर्‍या मारून परत जागेवर लावण्यात येईल. पालखी नदीपात्रातील मंदिरांना प्रदक्षिणा मारून जागेवर लावण्यात येईल. या व्यतिरिक्त महाराजांच्या पादुका फक्त चार भक्तांसोबत नगर प्रदक्षिणा करणार आहे. या उत्सवा दरम्यान कमीत कमी भक्त,त्यांच्यात सामाजिक अंतर ठेवून त्या त्या वेळेस शासन जे नियम सांगतील ते पूर्णपणे पाळले जाणार असल्याचे हभप प्रसाद महाराज यांनी सांगितले. या दरम्यान मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम हे सालाबादप्रमाणे कमीत कमी भक्तांच्या मदतीने ते पार पाडले जाणार आहे. प्रतिवर्षी संत सखाराम महाराज उत्सव व यात्रा ही संस्थांतर्फे मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. यातच शहरातील तसेच यासाठी प्रत्येकाकडे येणारे पाहुणे मंडळीही या आनंदात सामील होतात. यात गेल्या दोन वर्षांपासून यात्रेचे नदीपात्रातील स्वरूप माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी बदलविल्याने नागरिकांमध्ये मागील काळात उत्साह बघावयास मिळाला होता.

आर्थिक उलाढाल थांबणार
दरवर्षी यात्रेत रथाच्या दिवशीच एक ते दीड कोटींची उलाढाल होते. तर यात्रोत्सव काळात यात्रा संपेपर्यंत १० कोटींची उलाढाल होत असते. यावर शहरातील नागरिकांचे पुढील पावसाळ्याचे दिवस सहज पास होत असतात.पण यंदा आर्थिक उलढालीला ब्रेक लागणार असल्याची चिन्ह दिसत आहे.

आज स्तंभरोपण होणार
यात्रा दि २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्तंभरोपणाने सुरू होणार आहे. रथ दि.४ मे तर पालखी दि ८ मे रोजी निघणार आहे.