अखंड हरिनाम कीर्तन भागवत सप्ताह रद्द
मंदाणे। कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागात होत असून ग्रामीण जनजीवन ठप्प झाले आहे. गावात मागील 17 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत व हरिनाम कीर्तन सप्ताह यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला.
गेल्या 17 वर्षांपासून दरवर्षी हनुमान जयंती निमित्त मंदाणे येथील श्रीराम मंदिरावर संपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने अखंड भागवत व हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते. यात सकाळी पहाटे 4 वाजेपासून काकडा आरती, दुपारी 12 ते 5 भागवत कथा प्रवचन,सायंकाळी 5ते7 हरिपाठ व रात्री 8 ते 11 कीर्तन अशी कार्यक्रम रूपरेषा असायची.
या सप्ताहात गावातील व परिसरातील शेकडो भाविक दुपारी व रात्री श्रवण करत असत. यावेळी गावात 8 दिवस मांसाहारी पदार्थ विक्री बंद करण्यात येत असे. यामुळे 8 दिवस गावातील वातावरण चैतन्यमय व भक्तीमय राहत होते. गेल्या अनेक दशकात वेगवेगळ्या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना नागरिकाना सामोरे जावे लागले आहे. यात साथीचे रोग,पटकी, प्लेग,भूकंप, महापूर, चिकण-गुणिया,स्वाईन-फ्लू अशी अनेक संकटे आली. परंतु संपूर्ण देशात पहिल्यांदाच 21 दिवस पूर्ण संचारबंदी(लॉक डाऊन) लागली आहे. त्यामुळे संपूर्ण देश व देशातील ग्रामीण जीवन ठप्प झाले आहे. त्याचे पडसाद गावागावात उमटत आहेत.
गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेल्या सप्ताहाला देखील या संकटाची झळ पोहचली आहे. गावातील नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या बंदी आदेशाचे पालन करत, मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड कार्यक्रम रद्द करण्याचे ठरले आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.