कोरोना’वर उतारा भारतीय संस्कृतीचा

0

चेतन राजहंस

गेल्या काही दिवसांपासून जगामध्ये कोरोनाचा धुमाकूळ चालू असून त्यावर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायच मोठ्या प्रमाणात करण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. आज प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्याचा स्वीकार करत आहे, ते उपाय भारतीय संस्कृतीमध्ये धर्माचरण म्हणजेच दैनंदिन आचरण किंवा चांगल्या सवयीचा भाग म्हणून सांगितले आहेत. यामध्ये सनातन भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व दिसून येते. ‘कोरोना’वर वैज्ञानिक वैद्यकीय उपाय निघेल तेव्हा निघेलच, पण भारतीय संस्कृतीच्या आचरणाचा म्हणजे धर्माचरणाचा भाग केवळ कोरोनाच नाही, रोगराई, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीवरही उतारा आहे, हे निश्चित !

नमस्कार : अभिवादनाची परिपूर्ण पद्धत

कोरोनाचा संसर्ग होण्यासाठीच्या कारणांपैकी पाश्चात्त्य आणि युरोपीय देशांमध्ये प्रचलित असलेली हस्तांदोलनाची पद्धत हेही एक कारण आहे. हे लक्षात आल्यानंतर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, इस्रायल, तसेच अन्य अनेक देशांच्या प्रमुखांनी एकमेकांना भेटल्यावर हात जोडून नमस्कार करण्याची भारतीय (अर्थात् हिंदु) पद्धत अवलंबली. हस्तांदोलनाला पर्याय एवढेच नमस्काराच्या मुद्रेचे महत्त्व नसून अभिवादनाच्या या पद्धतीमध्ये इतरांपुढे नम्र होणे अथवा समोरच्या व्यक्तीमध्ये असणार्या ईश्वराच्या अंशापुढे लीन होणे असा आध्यात्मिक अर्थही सामावला आहे. पाश्चात्त्य जग त्या भावनेपर्यंत पोहोचले नसले, तरी कृतीच्या स्तरावर का होईना हस्तांदोलनाला राम-राम करून जग भारतीय संस्कृतीला नमस्कार करत आहे, हेही नसे थोडके !

आयुर्वेदाची देणगी

कोरोनाचा जेथून प्रारंभ झाला, त्या चीनमध्ये कोरोना पसरण्यामागे ‘विविध प्राण्यांचे अर्धे-कच्चे मांस खाणे’, हे कारण समोर आले होते. त्यानंतर अनेक जण मासांहारापासून दूर पळाले. हिंदु धर्मात मांसाहाराला तमोगुणीच म्हटले आहे आणि शाकाहाराचा पुरस्कार केला आहे. आजही भारतामध्ये बहुतांश जण शाकाहारी आहेत. भारतियांच्या जेवणामध्ये हळद, आले, मिरे, ओवा यांसारख्या संसर्गविरोधी आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांचा सर्रास उपयोग केला जातो. जेवण हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर ते यज्ञकर्म आहे, असा मानस येथील लोक जेवणापूर्वीच्या प्रार्थनेमधून व्यक्त करतात. भारतामध्ये आजही अनेक घरांना उंबरे आहेत. हे उंबरे केवळ वास्तूरचनेचा भाग नसून घराच्या बाहेर आणि आत काय गोष्टी असाव्यात, याची ती सीमारेषा आहे. ग्रामीण भागांमध्ये अंगण शेणाने सारवण्याची पद्धत येथे प्रचलित आहे. गोमय, गोअर्क यांचा अनेक ठिकाणी शुद्धीकरणासाठी उपयोग केला जातो. अशी कितीतरी सूत्रे सांगता येतील. या धर्माचरणाच्या कृती व्यक्तीचे जीवन आध्यात्मिक आणि निरोगी बनवतात. त्यामुळे या कृती दैनंदित आचरणात आणल्या, तर व्यक्तीचे वैयक्तिक, कौटुंबिक, तसेच सामाजिक जीवन आरोग्यदायी होईल, यात शंका नाही.

या व्यतिरिक्त रोगराईपासून वाचण्यासाठी आणि वातावरणाच्या शुद्धीसाठी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करण्याची संकल्पनाही भारतीय संस्कृतीमध्ये आहे. अग्निहोत्राच्या उपासनेमुळे वातावरण शुद्ध होऊन एकप्रकारचे संरक्षककवच निर्माण होते. अगदी किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्याचे सामर्थ्यही अग्निहोत्रामध्ये आहे. प्रतिदिन अग्निहोत्र करण्यामुळे वातावरणातील हानीकारक जीवाणूंचे प्रमाण लक्षणीय घटते, हेही वैज्ञानिक प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे. रामरक्षादि स्तोत्रांमध्येही स्तोत्रांचे श्रद्धापूर्वक पठण करणार्याचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण होईल, अशा प्रकारची फलश्रुती सांगितली आहे. याचा अनुभवही कित्येक जणांनी घेतला आहे. हिंदु धर्माने निर्देशित केलेली सूत्रे आज वैज्ञानिक स्तरावरही उपयुक्त म्हणून सिद्ध होत आहेत, हेच कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होत आहे.

‘अधर्माचरण’ हे सर्व रोगांचे मूळ

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन साथीच्या रोगांचा उद्भव झाला आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तींचेही प्रमाण वाढले आहे. केवळ पर्यावरणाचा र्हास हे यासाठीचे कारण नाही, तर या आपत्तींच्या मागे आध्यात्मिक कारणही आहे. ‘अधर्माचरण’ हे सर्व रोगांचे मूळ आहे’, असे आयुर्वेद सांगतो. धर्माचरण हे कृतीचे शास्त्र आहे. श्रद्धापूर्वक आचरण करणार्याला त्याचे फळ मिळतेच. आयुर्वेदिक आणि धर्माधिष्ठित जीवनप्रणालीचा अंगीकार, हीच निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे; पण गेल्या काही दशकांमध्ये ‘धर्माचरण म्हणजे मागासलेपण’ असे मानण्याचा दोष निर्माण झाला आहे. बुद्धीवादी म्हणवणार्या अनेक नास्तिकतावादी, पुरोगामी संघटना यांनी हा दोष मोठा केला आहे. हिंदु संस्कृतीला लक्ष्य करण्याचा एकमेव अजेंडा या संघटना राबवत आहेत. आज संपूर्ण जग भारतीय संस्कृतीकडे मोठ्या आशेने पहात असतांना कथित विज्ञानवादाच्या भ्रमात राहून भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा नाकारणे, हा करंटेपणा आहे. कथित पुढारलेपणाच्या नावाखाली सनातन संस्कृती झिडकारण्यापेक्षा धर्माशी पुन्हा नाळ जोडण्यात म्हणजे धर्माचरण करण्यातच व्यक्तीचे, पर्यायाने समाजाचे आणि राष्ट्राचे हित सामावले आहे.