जळगाव: सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे, मात्र यातही आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन लढा देत आहे. त्यांच्यासोबतच वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे पत्रकार देखील कोरोना फायटरची भूमिका बजावत आहे. त्यामुळे कोरोना विरुद्ध लढण्यात वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले. देवर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्र देवगिरीतर्फे आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी, औरंगाबाद लोकमत समाचारचे संपादक अभिताभ श्रीवास्तव सहभागी झाले होते.
वृत्तपत्राला डिजीटलची जोड आवश्यक – डॉ.युवराज परदेशी
२४ तास बातम्या देणारे माध्यमे आल्यानंतर आणि सोशल मीडियामुळे वृत्तपत्राचे अस्तित्व संपेल असा अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र तसे काहीही झालेले नाही व भविष्यातही होणार नाही. उलट सोशल मीडियामुळे वृत्तपत्राला फायदाच होत आहे. आगामी काळात वृत्त्तपत्रक्षेत्रात डिजीटल मीडियाचा वापर व महत्त्व वाढेल. यासाठी पत्रकारांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन डॉ.युवराज परदेशी यांनी केले. बदलत्या काळासोबत बदलले पाहिजे हे खरे असल्याने नवनवीन प्रयोग करत राहायला पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे बदल होणे आवश्यक आहे. काळाची पावले ओळखून डिजिटल मीडिया या अस्त्राचा वापर करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
वृत्तपत्राचे महत्त्व कमी होणार नाही – अभिताभ श्रीवास्तव
स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत वृत्तपत्राने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देखील वृत्तपत्राचे महत्त्व कायम आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मोठे बदल झाले, वृत्तपत्र क्षेत्रातही मोठे बदल झाले. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर वृत्तपत्र क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र या आव्हानावर वृत्तपत्र मात देणार आहे यात शंका नसल्याचे लोकमत समाचारचे संपादक अभिताभ श्रीवास्तव यांनी सांगितले. बदलत्या माध्यमामुळे वृत्तपत्राचे महत्त्व कमी होईल या भ्रमात कोणी राहू नये असेही श्रीवास्तव यांनी सांगितले. वृत्त्तपत्राचा वाचक आता ग्राहक होत असल्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.